निपाणी नगरी वृत्तसेवा (१७ फेब्रुवारी २०२६)
“कोगनोळीत २२ रोजी ‘संविधान आयडॉल – २०२६’ कराओके गायन स्पर्धा, अंध, अपंग व निराधार विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी संविधान मानवता सेवाभावी संस्थेचा सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम”
“गाण्याच्या सुरातून समाजसेवेची हाक…” — कोगनोळी येथे २२ रोजी रंगणार असलेली ‘संविधान आयडॉल – २०२६’ कराओके गायन स्पर्धा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून अंध, अपंग, गरीब व निराधार विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी उभारलेला सामाजिक सेतू ठरणार आहे. या संस्थेचा हा पहिलाच प्रयत्न आहे.
येथील संविधान मानवता सेवाभावी संस्था यांच्या वतीने रविवारी (ता. २२) खुल्या गटातील कराओके गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, कोगनोळी येथे होणाऱ्या या स्पर्धेला स्थानिक कराओके गायक ग्रुपचे सहकार्य लाभले आहे. ग्रामीण भागातील गायकांना व्यासपीठ देत शहरी पातळीवरील दर्जेदार आयोजन करण्याचा संस्थेचा प्रयत्न दिसून येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे महाराज, संत रोहिदास महाराज आणि माता रमाई यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. संस्थापक अध्यक्ष नितीन कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक १०,००१ रुपये, द्वितीय क्रमांक ७,००१ रुपये, तृतीय क्रमांक ५,००१ रुपये तसेच उत्तेजनार्थ २,००१ रुपये व उत्तेजनार्थ चार बक्षिसे अशी आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. सामाजिक बांधिलकी जपत कला-संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम कोगनोळी व परिसरातील युवक युवतींसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.
या संदर्भात निपाणी नगरी प्रतिनिधीशी बोलताना संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते नितीन कानडे म्हणाले, “संविधान मानवता सेवाभावी संस्था ही केवळ संस्था नसून सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. अंध, अपंग व निराधार विद्यार्थ्यांसाठी काम करताना समाजातील प्रत्येक सजग नागरिकाने सभासद म्हणून पुढे यावे, असे आमचे आवाहन आहे.”
ते पुढे म्हणाले, “राष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळाल्यानंतरही आमची बांधिलकी ही समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचीच आहे. अधिकाधिक युवकांनी संस्थेचे सभासद होऊन समाजकार्यात सहभागी व्हावे.”
संविधान मानवता सेवाभावी संस्था सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय असून ‘संविधान आयडॉल – २०२६’ या स्पर्धेमुळे कराओके गायन स्पर्धा, सामाजिक मदत, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम अशा विविध अंगांनी सकारात्मक वातावरण निर्माण होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमास प्रतिसाद द्यावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
━🔷कार्यक्रमाचे क्षणचित्र आणि विशेष अहवाल लवकरच Nipani Diary YouTube चॅनेलवर पाहायला मिळणार असून, ही बातमी आपल्या मित्र-परिवारास जरूर शेअर करा.🔷 “संविधान आयडॉल – २०२६’ कराओके गायन स्पर्धेतून अंध, अपंग व निराधार विद्यार्थ्यांना मदतीचा हात.”