निपाणी नगरी वृत्तसेवा..(21)
आज दिनांक 21 /2 /2026,शनिवार रोजी अंकुरम शाळेमध्ये पेरेंट्स एंगेजमेंट प्रोग्रॅम पार पडला. अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नेहमीच विविध क्रियाकलाप माध्यमातून मुलांना सक्रिय ठेवले जाते. याच अनुषंगाने गेली सहा वर्षे अंकुरम शाळा “क्रीडो”(CRIDO) सोबत कार्यरत असून शाळेमध्ये यासाठी एक स्वतंत्र लॅब देखील आहे.
पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांना क्रियाकलाप माध्यमातून शिकता यावे तसेच त्यांच्या शिक्षणाचा पाया भक्कम व्हावा या उद्देशाने या लॅबचे आयोजन करण्यात आले असून इथे नर्सरी ते सिनियर के.जी. मधील सर्व विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक माध्यमातून शिक्षण दिले जाते. याचे प्रदर्शन आज शाळे मार्फत आयोजित करण्यात आले होते. यावेळी शाळेतील सर्व पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच विविध मॉडेल्स मधून व क्रियाकलाप माध्यमातून त्यांनी सर्व पालक वर्गासमोर त्यांचे कौशल्य सादर केले. यामध्ये गणित, इंग्रजी ,समाज विज्ञान अशा विविध विषयांवर आधारित क्रियाकलाप माध्यमे विद्यार्थ्यां मार्फत सादर करण्यात आली.
यावेळी अंकुरम शाळेचे सेक्रेटरी डॉक्टर अमर चौगुले, शाळेच्या प्राचार्या सौ चेतना चौगुले, क्रीडो सदस्य श्री आशिष माळी व श्री विजय पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या स्वागताने व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी शाळेचे सेक्रेटरी डॉक्टर अमर चौगुले यांनी पालकांशी संवाद साधताना लहान मुलांचा आहार व त्यांचे निरोगी आरोग्य तसेच आजच्या युगातील स्पर्धात्मक आघाडी या विषयांवर पालकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास पालकांनी उत्तम प्रतिसाद देत शाळेने राबविलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुकही केले .याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ चेतना चौगुले यांच्यासोबत शाळेचा सर्व पालक- विद्यार्थी वर्ग व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.