निपाणी नगरी वृत्तसेवा..(20)
“वनमित्र संस्थेचा हा प्रयत्न केवळ स्वच्छता मोहीम नसून — तो आहे इतिहास जपण्याचा संकल्प, तो आहे पर्यावरण संवर्धनाचा निर्धार, आणि तो आहे शिवरायांच्या विचारांना कृतीतून अभिवादन. “किल्ले वाचवा, इतिहास जपा, पर्यावरण जतन करा” — या ध्येयवाक्यासह वनमित्र संस्था समाजाला एक सकारात्मक दिशा देत आहे. अशा अभिनव आणि प्रेरणादायी कार्यासाठी वनमित्र संस्था, शिवराज्य मंच कागल आणि शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचे मनःपूर्वक अभिनंदन! जय शिवराय! 🚩✒️विक्रम चव्हाण,कागल”
छत्रपती शिवरायांची जयंती म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर स्वराज्य, स्वाभिमान आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव जागवण्याचा दिवस. गेली वीस वर्षे ही जाणीव कृतीतून साकारत आहे ती कागल येथील वनमित्र संस्था.
यावर्षीही १९ फेब्रुवारी शिवजयंती निमित्त वनमित्र संस्थेने किल्ले स्वच्छता अभियान राबवत इतिहास आणि पर्यावरण यांचा सुंदर संगम घडवून आणला. या उपक्रमासाठी निवड झाली ती किल्ले संतोषगड (ता. फलटण, जि. सातारा) या ऐतिहासिक गडाची.
इतिहासाची भेट आणि प्रवासाची सुरुवात..
१८ फेब्रुवारी रोजी कागल, निपाणी, आप्पाचीवाडी, कोल्हापूर ,हुपरी परिसरातील सदस्य सहकुटुंब सहभागी झाले. साताऱा- फलटण मध्ये असणा-या किल्ले वर्धनगड येथे प्रथम भेट देत इतिहासाची ओळख करून घेतली. गडदर्शना नंतर सर्वांनी पायथ्याशी एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला आणि पुढील प्रवासास प्रारंभ केला.
दुपारी ताथवडे गावात पोहोचताच स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. परिसरात कचरा संकलन करण्यात आले. गावातून पर्यावरणपूरक प्रभात फेरी काढण्यात आली. “आम्ही भारतीय — आम्ही एक आहोत”, “पाणी जपुन वापरा”, “झाडे लावा व जगवा,“प्लास्टिक टाळा”, “पर्यावरण वाचवा”, “मराठी शाळा वाचल्याच पाहीजेत ”संविधान जिंदाबाद” अशा घोषणांनी गाव दुमदुमून गेले.
शाहिरी आणि विचारांची मेजवानी..
सायंकाळी शिरोळ तालुक्यातील शाहीर पटेल यांच्या प्रभावी शाहिरी कार्यक्रमाने वातावरण भारावून गेले. शिवरायांच्या जीवनातील पराक्रम, स्वराज्याची प्रेरणा आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश त्यांनी आपल्या पोवाड्यातून दिला. कार्यक्रमाचे उद्घाटन ताथवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या हस्ते झाले.
यानंतर कॉम्रेड धनाजी गुरव यांनी तेराव्या शतकापासून आजपर्यंतच्या ऐतिहासिक घटनांचा सामाजिक परिणाम यावर सखोल मार्गदर्शन केले. इतिहास, विचार आणि प्रेरणा यांची ही संगममेळा ठरला.
शिवजन्मोत्सव गडावर..
१९ फेब्रुवारी सकाळी गावातील मंदिरातून छत्रपती शिवरायांची पालखी सवाद्य गडाकडे निघाली. महा दरवाज्यापाशी संस्थेचे अध्यक्ष अक्षय भोसले व सौ. श्रुतिका भोसले यांच्या हस्ते गडपूजन करून शिवजयंतीची सुरुवात झाली. पालखी गडावरील सदरेवर ठेवून शिवजन्म सोहळा उत्साहात पार पडला.
गड चढताना वाटेत दिसलेला सर्व प्लास्टिक कचरा सदस्यांनी गोळा करून खाली आणला. स्वच्छतेचा संदेश कृतीतून देत वनमित्रांनी सामाजिक बांधिलकी जपली.
वारशाची ओळख..
परतीच्या प्रवासात वाठार निंबाळकर येथील महाराणी सईबाई यांचा वाडा तसेच फलटण येथील ऐतिहासिक राम मंदिर फलटण व निंबाळकर राजघराण्याचा वाडा पाहून सर्वजण इतिहासाच्या वैभवाने भारावून गेले.
वनमित्र — परंपरेचा जिवंत वारसा..
वनमित्र संस्था, कागल गेली दोन दशके शिवजयंती किल्ल्यावर जाऊन किल्ले स्वच्छता अभियानातून साजरी करत आहे. महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांची अवस्था दयनीय आहे. त्यांचे संवर्धन, जतन आणि पुढील पिढ्यांपर्यंत वारसा पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.