निपाणी नगरी वृत्तसेवा..(22)
कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व आर्ट्स प्री मिलिटरी कॉलेज व युवा सायन्स ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने संकुलात दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कुमार पाटील हे होते. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेच्या अध्यक्षा रेखा पाटील , प्राचार्य अनमोल पाटील व मुख्याध्यापिका कोमल पाटील तसेच चंद्रकांत पाटील व वंदना शिरगुप्पे हे पालक प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महादेवी चेंडके यांनी केले. नंतर मान्यवरांच्या अमृत हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. नंतर संयोजकांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करून दहावी व बारावी विद्यार्थ्यांना पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
सचिन बेलेकर, किरण संकपाळ , नितीन पाटील यांनी शिक्षक मनोगत व्यक्त केले . प्राचार्य अनमोल पाटील यांनी दहावी व बारावी हे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे वर्ष असून यामध्ये विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन जिद्दीने अभ्यास करत उज्वल यश मिळवणे गरजेचे आहे कारण यातूनच आपली उत्तम ओळख होते असे सांगितले. यानंतर सचिव कुमार पाटील यांनी दहावी आणि बारावी ही केवळ परीक्षा नसून आयुष्याच्या पुढील वाटचालीस हा महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रवासात तुम्ही अभ्यासा सोबत शिस्त , वेळेचे महत्व , मैत्री आणि जबाबदारी यांचे धडे आयुष्यभर टिकवून ठेवणे आवश्यक आहे. जिद्द आणि आत्मविश्वास हेच तुमचे खरे मित्र आहेत आणि यातूनच आपल्याला यश मिळते हा आत्मविश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी संकुलातील सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार पवार यांनी केले तर आभार आरती कारागीर यांनी मानले.