निपाणी नगरी वृत्तसेवा..(27)
निपाणी मराठा मंडळ संचलित निपाणी मराठा मंडळ हायस्कूलमध्ये २७ फेब्रुवारी रोजी मराठी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. डी. डी. हळवणकर होते. मराठी विषय शिक्षक श्री. एस. डी. साखळकर, श्री. के. एल. कांबळे, कु. प्रियांका पाटील तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक डी.डी. हाळवणकर यांनी मराठी भाषेचा उगम, तिची ऐतिहासिक वाटचाल तसेच मराठी साहित्याची समृद्ध परंपरा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. ललित लेखन, कादंबरी, काव्यसंग्रह, अभिजात भाषा प्रणाली ते विज्ञानवादी विचारसरणी पर्यंतचा विस्तृत इतिहास त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केला. कुसुमाग्रज यांच्या साहित्याचा उल्लेख करताना त्यांनी त्यांच्या गाजलेल्या नटसम्राट या नाटकासह ‘कणा’ सारख्या कवितांचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
मराठी दिनानिमित्त मराठी शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. श्री. के.एल.कांबळे यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेविषयी प्रेम जपण्याचे आवाहन केले. “आपली मातृभाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. तिच्याबद्दल अभिमान आणि प्रेम असणे गरजेचे आहे,” असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. प्रियांका पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वी व प्रेरणादायी ठरला.