📍निपाणी नगरी वृत्तसेवा| प्रतिनिधी (28)
“संस्थेच्या 36 व्या वर्धापन दिनानिमित्त सुमारे 250 रुग्णांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ; “निरोगी समाज हीच खरी संपत्ती”चा संदेश”
कर्नाटकातील सहकार क्षेत्रातील अग्रेसर संस्था श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणी यांच्या 36 व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर कणेरी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत श्री महात्मा बसवेश्वर सभागृह, चिकोडी रोड, निपाणी येथे पार पडले. या उपक्रमास निपाणी शहर व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त व मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे चेअरमन किशोर बाली (सी.ए) यांनी प्रमुख उपस्थिती लाभलेले श्री प्राणलिंग स्वामीजी, सिद्धगिरी हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर्स व कर्मचारी यांचे स्वागत केले. सहकार रत्न संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ. सी. बी. कुरबेट्टी, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाच्या हस्ते उपस्थित मान्यवर व महिला डॉक्टर्स यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे संचालक महेश बागेवाडी यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उद्घाटन केले, तर श्री वीरूपाक्षलिंग देवस्थान समाधी मठ, निपाणीचे प्रमुख श्री प्राणलिंग स्वामीजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
मार्गदर्शन करताना डॉ. सी. बी. कुरबेट्टी यांनी संस्थेची प्रगती अधोरेखित करत सांगितले की, सध्या 36 शाखांमार्फत यशस्वी आर्थिक व्यवहार सुरू असून कर्नाटक राज्यात 100 शाखा सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. संस्थेकडे सध्या सुमारे 650 कोटी रुपयांच्या ठेवी असून 1000 कोटींचा टप्पा गाठण्याचा संकल्प आहे. सभासदांनी आपले आर्थिक व्यवहार संस्थेमार्फत वाढवून सहकार चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
मोफत आरोग्य शिबिरात अस्थिरोग, कृत्रिम गर्भधारणा, मज्जारोग, स्त्रीरोग, नेत्ररोग आदी विविध आजारांची तपासणी करून तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला व आवश्यक औषधोपचार देण्यात आले. सुमारे 250 रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, व्यायाम व मानसिक तंदुरुस्ती यांचे महत्त्व अधोरेखित करत या शिबिरातून “आरोग्य हीच खरी संपत्ती” हा संदेश देण्यात आला. अशा सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांमुळे संस्थेबद्दल नागरिकांमध्ये विश्वास व आपुलकी अधिक दृढ होत असून सहकार चळवळीला सकारात्मक चालना मिळत आहे.
कार्यक्रमास संस्थेचे संचालक प्रताप पटनशेट्टी, डॉ. एस. आर. पाटील, श्रीकांत परमणे, सुरेश शेट्टी, अशोक लिगाडे, दिनेश पाटील, राजेश पाटील, संचालिका पुष्पा कुरबेटी, विजया शेट्टी, सुवर्णा पटनशेट्टी, सीईओ एस. के. आदन्नावर, असिस्टंट सीईओ महेश शेट्टी, विद्या कमते, महादेव बडगीर, भद्रेश फुटाणे तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असिस्टंट सीईओ सुजाता जाधव व राजेंद्र मगदूम यांनी केले तर आभारप्रदर्शन सुरज घोडके यांनी मानले.