निपाणी नगरी वृत्तसेवा..(20)
“घरकुलांचा खेळ की राजकीय तमाशा?; काँग्रेस-भाजपच्या घोषणाबाजीत गरीब लाभार्थी पुन्हा वाऱ्यावर! लॉटरीवरून राजकीय राडा; दोन्ही पक्षांनी आपापल्या पोळ्या भाजल्या, मात्र घरासाठी हतबल महिलांना अखेर रिकाम्या हाताने परतावे लागले. घोषणाबाजीपेक्षा संवाद, आरोपांपेक्षा समन्वय आणि राजकारणापेक्षा प्रशासनिक स्पष्टता यांना प्राधान्य दिल्यास गरीबांच्या डोक्यावरचे छप्पर हे केवळ निवडणुकीचे आश्वासन न राहता प्रत्यक्ष वास्तव ठरू शकते.”
निपाणीतील दाईंगडे मळा येथे बुधवारी आयोजित घरकुल वितरण कार्यक्रम अखेर राजकीय कुरघोड्या, घोषणाबाजी आणि अहंकाराच्या लढाईत पूर्णपणे कोलमडला. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी “गरीबांच्या घराचा प्रश्न” हा विषय सोडवण्याऐवजी त्यावर राजकीय पोळी भाजण्याचा सपाटा लावल्याने हजारो लाभार्थी महिलांना दिवसभर उन्हात, उपाशीपोटी ताटकळत राहावे लागले.
६०० लाभार्थ्यांची लॉटरी काढण्याचा निर्णय जाहीर होताच काँग्रेसने ९४८ लाभार्थ्यांचा समावेश करण्याची मागणी करत आक्षेप घेतला. भाजपकडून ८०० लाभार्थ्यांचा पर्याय पुढे आला; मात्र दोन्ही बाजूंनी समन्वयाऐवजी घोषणाबाजी आणि शक्तिप्रदर्शनालाच प्राधान्य दिले. परिणामी सकाळपासून सुरू झालेला गोंधळ सायंकाळपर्यंत चालला आणि अखेर प्रशासनाने निवड प्रक्रिया रद्द करून कार्यक्रम पुढे ढकलला.
या संपूर्ण प्रकारात सर्वाधिक भरडली गेली ती गरीब जनता. अनेक महिलांनी पैसे भरूनही नाव नसल्याची व्यथा मांडली, तर काही महिला लहान मुलांसह सकाळपासून कार्यक्रमस्थळी बसून होत्या. पण त्यांचे अश्रू, त्यांची घालमेल आणि त्यांच्या घराचे स्वप्न हे दोन्ही पक्षांच्या राजकीय आरोळ्यांमध्ये हरवून गेले.
कार्यक्रमानंतर काँग्रेसने अन्यायाचा मुद्दा उचलला, तर भाजपने विरोधकांवर कार्यक्रम उधळल्याचा आरोप केला. मात्र वास्तव एवढेच की, दोन्ही बाजूंनी जर थोडी परिपक्वता आणि जनतेबद्दल संवेदनशीलता दाखवली असती, तर गरीबांच्या घराचा प्रश्न तिथल्या तिथे मार्गी लागू शकला असता.
राजकारण नको, उपाय हवा तर काय करता येईल?
जर खरंच घरकुलांचा प्रश्न सोडवायचा असेल, तर सर्व लाभार्थ्यांची पारदर्शक अंतिम यादी आधीच जाहीर करणे, अर्जांची खुली पडताळणी करणे आणि सर्वपक्षीय समितीच्या उपस्थितीत लॉटरी प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे. घोषणाबाजीपेक्षा संवाद, आरोपांपेक्षा समन्वय आणि राजकारणापेक्षा प्रशासनिक स्पष्टता यांना प्राधान्य दिल्यास गरीबांच्या डोक्यावरचे छप्पर हे केवळ निवडणुकीचे आश्वासन न राहता प्रत्यक्ष वास्तव ठरू शकते.