निपाणी नगरी वृत्तसेवा (22)
“घरकुलांचा खेळ थांबवा; १५ दिवसांत घरे द्या, अन्यथा आंदोलन!” — विलास गाडीवड्डरांचा थेट इशारा “जिल्हा बँकेत हातात हात घालून डान्स करणारे आता घरकुलांवर विरोधाचे नाटक करतायत”; स्व. काकासाहेब पाटील, रमेश जारकीहोळी यांच्या प्रयत्नांची गाडीवड्डरांनी केली आठवण “गरिबांना घरे नकोत, फक्त राजकारण हवे का?”घरकुल वाटपाच्या मुद्द्यावरून निपाणीचे राजकारण पुन्हा पेटले असून, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी आमदार शशिकला जोल्ले, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. “गरिबांना दिवसभर उपाशी ठेवून राजकीय तमाशा करणाऱ्यांनी आता उत्तर द्यावे,” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.”
“जिल्हा बँक निवडणुकीवेळी हातात हात घालून ‘बने चाहे दुश्मन जमाना हमारा’च्या तालावर डान्स करणारे लोक आता घरकुल वाटपाच्या वेळी अचानक विरोधक बनल्याचे नाटक करत आहेत. हा सर्व प्रकार निपाणीतील गोरगरिबांच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठीच आहे,” असा घणाघाती आरोप माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी केला.
पत्रकार परिषदेत बोलताना गाडीवड्डर यांनी स्पष्ट इशारा दिला की, “येत्या १५ दिवसांत २०५२ घरकुलांचे पारदर्शक वाटप झाले नाही तर लाभार्थ्यांसह पालिका आवारात तीव्र आंदोलन उभे करू.”
घरकुल प्रकल्पासाठी स्व. काकासाहेब पाटील, तत्कालीन पालकमंत्री रमेश जारकीहोळी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब देसाई (सरकार), तत्कालीन नगरसेवक आणि आश्रय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने प्रयत्न केल्याची आठवण त्यांनी करून दिली. “२०१८ मध्ये मंजुरी मिळवण्यासाठी आम्ही बेंगळुरूपर्यंत पाठपुरावा केला. तत्कालीन जिल्हाधिकारी जियाउल्लाह यांना आदेश देऊन घरे मंजूर करण्यात आली. त्यावेळी यातील काही मंडळींना आत्ताच्या दाइंगडे मळ्यातील ती जागाही माहिती नव्हती, पण आज तेच लोक श्रेय घेण्यासाठी पुढे सरसावत आहेत,” असा टोला गाडीवड्डर यांनी लगावला.
गाडीवड्डर पुढे म्हणाले, “जर खरोखरच पारदर्शकता होती तर लाभार्थी यादी आधी जाहीर का केली नाही? बंद खोलीत चर्चा करून यादी तयार करता येत होती. पण हेतू घरे वाटण्याचा नव्हता; हेतू होता तमाशा करून निपाणीचे नाव बदनाम करण्याचा.”
२० मे रोजी झालेल्या गोंधळावरही त्यांनी जोरदार टीका केली. “गरिबांना दिवसभर उपाशी ठेवले, आशा दाखवली आणि शेवटी गोंधळ घालून राजकारण केले. हा प्रकार निपाणीच्या इतिहासाला काळीमा फासणारा आहे,” असे ते म्हणाले.
“शाहूनगर, संभाजीनगर, आंबेडकरनगर, शिंदेनगरसारख्या वसाहती पूर्वीच्या नेतृत्वाने उभ्या केल्या. पण विद्यमान नेतृत्वाने गरिबांसाठी एकही मोठा सार्वजनिक प्रकल्प उभा केला नाही,” उलट अनेक छोट्या व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडण्याचा वसा उचलल्याचा आरोपही त्यांनी केला.
शेवटी गाडीवड्डर यांनी सर्वपक्षीय बैठकीचे खुले आव्हान देत म्हटले, “कोणाचे काय काम केले, ते कागदोपत्री मांडूया. गरीबांविषयी खरोखर कळवळा असेल तर ज्यांच्याकडे पैसे भरण्याची क्षमता नाही, त्या लाभार्थ्यांची रक्कम जोल्ले समूहाने भरावी; पण गरिबांचा वापर राजकारणासाठी करू नये.”
यावेळी बाळासाहेब देसाई (सरकार), विनोद चोरगे, संभाजी गायकवाड, विकास जाधव, अजित पोवार,अविनाश शिंदे आदी उपस्थित होते.