निपाणी नगरी वृत्तसेवा (4)
💉💉💉🩺🩺🩺💉💉
“निरोगी शरिरातच एक निरोगी मन वसते” या विचाराला साजेसा आणि विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा प्रेरणादायी कार्यक्रम डॉक्टर्स डे निमित्त अंकुरम इंग्लिश मिडीयम स्कूल येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थिनी मध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, पौगंडावस्थेतील बदल समजावून सांगणे आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. प्रतिभा पाटील यांची उपस्थिती लाभली. तसेच शाळेच्या प्राचार्या सौ. चेतना चौगुले यांचीही प्रेरणादायी उपस्थिती विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शक ठरली.
डॉ. प्रतिभा पाटील यांनी पौगंडावस्था हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगत, या काळात होणारे शारीरिक आणि मानसिक बदल अतिशय सोप्या आणि समजेल अशा भाषेत विद्यार्थिनींना समजावून सांगितले. योग्य आहार, वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची काळजी, मानसिक संतुलन, आत्मविश्वास आणि निरोगी जीवनशैली याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थिनीही उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
यानंतर प्राचार्या सौ. चेतना चौगुले यांनी मुलींच्या मानसिक जडणघडणीमध्ये संस्कार, आत्मविश्वास, शिस्त, सकारात्मक विचार आणि योग्य निर्णयक्षमता यांचे महत्त्व स्पष्ट केले. आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षणासोबतच चांगले व्यक्तिमत्त्व घडवणे तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक विद्यार्थिनीने स्वतःवर विश्वास ठेवून आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न करावेत, असा प्रेरणादायी संदेश ही त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शाळेच्या सहशिक्षिका सौ. ओसिया शहा यांनी अतिशय सुंदर आणि नेटकेपणाने केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व परिचय सौ. पौर्णिमा वंजारे यांनी मनोगतपूर्ण शब्दांत करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थिनींनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला. डॉक्टर आणि शिक्षक यांच्या संयुक्त मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींना आरोग्य, स्वच्छता, मानसिक स्वास्थ्य, आत्मविश्वास आणि जीवनमूल्यां विषयी अमूल्य माहिती मिळाली. हा कार्यक्रम केवळ “डॉक्टर्स डे”चा औपचारिक उपक्रम न राहता विद्यार्थिनींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविणारा आणि त्यांना निरोगी, सशक्त व आत्मविश्वासपूर्ण भविष्यासाठी प्रेरणा देणारा ठरला.
शेवटी उपस्थितांनी कार्यक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत अशा मार्गदर्शनपर उपक्रमांचे आयोजन सातत्याने व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.