निपाणी नगरी वृत्तसेवा (17)
कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व आर्ट्स प्रि मिलिटरी कॉलेज व युवा सायन्स अकॅडमी या सैनिकी शाळेच्या विद्यमाने संकुलात राजमाता जिजाऊ पुण्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा रेखा पाटील या होत्या. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे सचिव कुमार पाटील, प्राचार्य अनमोल पाटील व मुख्याध्यापिका कोमल पाटील हे उपस्थित होते.
प्रारंभी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक ओंकार करंगळे यांनी केले. नंतर मान्यवरांच्या अमृत हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन देण्यात आले. नंतर उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी तुषार पवार व त्रिशेला दत्तवाडे यांनी शिक्षक मनोगत व्यक्त केले. नंतर मुख्याध्यापिका कोमल पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना राजमाता जिजाऊंचे संपूर्ण जीवन हे संघर्ष , ध्येय आणि त्यागाचे प्रतीक असून त्यांच्या संस्कारांनी एका युगपुरुषाची निर्मिती झाली असल्याचे सांगितले. संकटे कितीही मोठी असली तरी ध्येय , आत्मविश्वास आणि कर्तव्यनिष्ठा यांच्या जोरावर आपण इतिहास घडवू शकतो ही शिकवण राजमाता जिजाऊंच्या जीवनातून शिकायला मिळते असेही त्यांनी सांगितले. नंतर संस्थापिका रेखा पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना राजमाता जिजाऊंच्या विचारांनी आणि संस्कारांनी इतिहासाला एक नवी दिशा मिळाली असून त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन ज्ञान , संस्कार , मेहनत व शिस्त यांच्या आधारावर स्वतःचे आणि समाजाचे उज्वल भविष्य घडविण्याची आपण शपथ घेतली पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली . यावेळी अजित पाटील, श्रीनिवास नलवडे, अभिनव नाईक, संदीप कुऱ्हाडे, किरण संकपाळ, नितीन पाटील, रोशनी आवटे, महादेवी चेंडके, आरती कारागीर, अक्षता कांबळे, रूपा खोत यांच्यासह संकुलातील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नाली चेंडके यांनी केले तर आधार वर्षा कांबळे यांनी मानले .