निपाणी नगरी वृत्तसेवा संकेश्वर दि २० ( प्रतिनिधी )
“संकेश्वरात अनैतिक संबंधातून युवकाचा निर्घृण खून, मयत बाबू भूसगोळला खुरपे, लोखंडी रॉड व दगडाने ठेचून मारले! अनैतिक संबंध आणि पालिका पोटनिवडणूकीतील काटा काढला!”
संकेश्वर गोरक्षण माळ येथील बाबू शंकर भूसगोळ वय ( ३५ ) यास शुक्रवार मध्यरात्री १२.४५ वाजता सहा जणांनी मिळून खुरपे,लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.बाबू भूसगोळचा खून अनैतिक संबंध आणि पालिका पोटनिवडणूक ईर्ष्येतून घडल्याची नोंद संकेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
खूना संदर्भात पोलीस सूत्रांकडून व घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी बाबू शंकर भूसगोळ हा शुक्रवारी रात्री १२.४५ वाजता आपल्या मोटारसायकल ( स्कूटी ) वरुन घराकडे निघालेला असताना गोरक्षण माळ रस्त्यावर अगोदरच दबा धरुन बसलेले सुब्बाराव अनंत भिसुरे, अक्षय बाबासाहेब मरडी,पवन श्रीधर मरडी, अनिल बाळासाहेब मरडी संदीप अप्पासाहेब मरडी व सुरेश ईश्वर मरडी यानी बाबू भूसगोळ याला अडवून धक्का देऊन स्कुटीवरुन खाली पाडले. बाबूच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जबर प्रहार केला.पोटावर हातावर खुरप्याने सपासप वार करून डोक्यावर मोठा दगड घालून निर्घृण खून केला. खुनाची घटना गोरक्षण माळ येथील रमेश धुडूम यांच्या घराच्या गेटजवळ घडली आहे. आरोपींनी खुनाची पूर्वतयारी करुन बाबूचा काटा काढल्याचे सांगितले जात आहे.
घटनास्थळी सुब्बाराव भिसुरे बसूनच राहिला!….
बाबू भूसगोळ यांचे सुब्बाराव भिसुरे याची पत्नी वर्षा बरोबर अनैतिक संबंध होते. त्यामुळे सुब्बाराव चांगलाच संतप्त झाला होता. बाबूचा खुण करुन तो घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला बाबुचा मृतदेह पहात बसला होता. खून करण्यापूर्वी आरोपींनी गोरक्षण माळ येथील पथदीप ( लाईट ) फ्यूज काढून बंद करुन डाव साधला. बेळगाव पोलीस प्रमुख के रामराजन यांच्या मार्गदर्शनाखाली गोकाक डी.एस.पी रवि डी नायक यांच्या नेतृत्वाखाली संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणपती कोगनोळी यांनी आरोपींना काही तासात अटक करुन खूनाचा तपास लावला. संकेश्वर पोलीस ठाण्यात खून प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.