निपाणी नगरी वृत्तसेवा (19)
अर्जुननगर येथील मोहनलाल दोशी विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील एसएससी (SSC) परीक्षा, एनएमएमएस (NMMS) परीक्षा आणि बिल्डथॉन स्पर्धेत दैदिप्यमान यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह उपस्थित होत्या, तर प्रारंभी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एम. गोडबोले यांनी प्रास्ताविकातून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील आयुष्यात गरुडझेप घ्यावी, संकटांनाच संधी मानावे आणि सातत्याने शिस्तबद्ध प्रयत्न करावेत असे मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांच्या गुणांचे कौतुक करत डॉ. तृप्तीभाभी शाह म्हणाल्या की, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी व विविध क्षेत्रात करिअर करण्यासाठी समर्पणभाव, सातत्य, चिकाटी आणि जिद्द आवश्यक आहे, याबरोबरच आशावाद आणि सकारात्मक दृष्टिकोनही तितकाच महत्त्वाचा असून प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो ती ओळखून त्याचा पुरेपूर उपयोग करताना विद्यार्थ्यांनी नम्रता, कृतज्ञता आणि संस्कार जपावेत. या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेतील, आठवीच्या एनएमएमएस परीक्षेतील, तसेच बिल्डथॉन स्पर्धेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सुषमा मोरबाळे व महादेव पंदीवडे या पालकांनी, तर जानवी साळवी व मयुरी पाटील या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. आर. पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार एस. बी. यादव यांनी मानले.
या कार्यक्रमाला व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक आर. एस. भोसले, एस. एम. चौगुले, एस. एस. सांडगे, एस. के. बुच्चे आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. आशिषभाई शाह यांच्यासह सर्व संचालकांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले असून, कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.