निपाणी नगरी वृत्तसेवा (26)
कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व आर्ट्स प्रि मिलिटरी कॉलेज व युवा सायन्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने संकुलात राजश्री शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कुमार पाटील हे होते. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेच्या अध्यक्षा रेखा पाटील, प्राचार्य अनमोल पाटील व मुख्याध्यापिका कोमल पाटील हे उपस्थित होते. प्रारंभी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक वैशाली पाटील यांनी केले. नंतर उपस्थित मान्यवरांच्या अमृत हस्ते राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला. नंतर नितीन पाटील यांनी शिक्षक मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका कोमल पाटील यांनी मनोगतात राजश्री शाहू महाराजांचे जीवन आपल्याला समता, शिक्षण, सेवा आणि मानवतेचा संदेश देते. आजच्या पिढीने शाहू महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षणाची कास धरावी , मेहनत करावी आणि समाजात समानता व बंधुभाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत असा संदेश दिला. प्राचार्य अनमोल पाटील यांनी आपल्या मनोगतात राजश्री शाहू महाराजांनी समाजातील अस्पृश्यता, जातीभेद आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवून शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिले असल्याचे सांगितले.
संस्थेचे सचिव कुमार पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतात शिक्षण हेच परिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे हे राजश्री शाहू महाराजांचे विचार सांगताना त्यांनी समाजात ज्ञान, समानता आणि मानवतेचा मार्ग दाखवून आपले जीवन समाजातील दुर्बल, वंचित आणि गरजू लोकांच्या उन्नतीसाठी समर्पित केले असून त्यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देतात असे सांगितले . यावेळी या कार्यक्रमाचे औचित्य साधून इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संकुलातील सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी मिस्त्री यांनी केले तर आभार अस्मिता दिवटे यांनी मानले.