निपाणी नगरी वृत्तसेवा (25)
कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व आर्ट्स प्रि मिलिटरी कॉलेज व युवा सायन्स अकॅडमी या संकुलामध्ये कादंबरी घस्ते यांचा सत्कार करण्यात आला . बी.ए एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण करून वकिली सेवेमध्ये पदार्पण केल्याबद्दल त्यांचा हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता . कोगनोळी गावच्या त्या प्रथमच महिला वकील आहेत. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कुमार पाटील हे होते . तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेच्या अध्यक्षा रेखा पाटील, प्राचार्य अनमोल पाटील व मुख्याध्यापिका कोमल पाटील तसेच नेताजी घस्ते, संगीता घस्ते, सम्मेद घस्ते व मुरलीधर मिस्त्री हे उपस्थित होते.
प्रारंभी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक वर्षा कांबळे यांनी केले . यानंतर कादंबरी घस्ते यांचा शाल, श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला . यानंतर सत्कारमूर्ती कादंबरी घस्ते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ स्वप्न पाहणे पुरेसे नसते तर त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी योग्य दिशा, कठोर परिश्रम आणि आढळ आत्मविश्वासाची गरज असते हे सांगताना मोठे ध्येय ठेवण्यास कधीही घाबरू नका कारण मोठी स्वप्ने पाहणारे इतिहास घडवतात. यशस्वी व्यक्तींच्या जीवनात संघर्ष असतो , अडचणी असतात पण त्यांच्या प्रयत्नांमध्ये सातत्य आणि मनामध्ये जिंकण्याची जिद्द असते म्हणून यशस्वी व्यक्तींच्या संघर्षातून आणि प्रेरणेतून आपण धडे घेतले पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले. नंतर संस्थेचे सचिव कुमार पाटील यांनी मनोगतात परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रयत्न महत्त्वाचे आहेत कारण मेहनतीच्या मार्गावर चालणाऱ्याच्या हातातच यशाची पहाट येते हा आत्मविश्वास त्यांनी मनोगतातून दिला .
यावेळी श्रीनिवास नलवडे , किरण संकपाळ , तुषार पवार , संदीप कुराडे ,अभिनय नाईक , साधना मधाळे , महादेवी चेंडके , अक्षता कांबळे , सरिता दिवटे यांच्यासह संकुलातील सर्व शिक्षक , विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिशेला दत्तवाडे यांनी केले तर आभार सीमा लोकरे यांनी मानले .