निपाणी नगरी वृत्तसेवा (25)
आषाढी एकादशीच्या पावन पर्वा निमित्त प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोडणी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शनिवारी पहाटेपासूनच भक्तांचा महापूर उसळला. निपाणीसह परिसरातील हजारो भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली. टाळ-मृदंगाचा निनाद, वारकऱ्यांचे अभंग, दिंड्यांचा उत्साह आणि अखंड नामस्मरण यामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसाने भारावून गेला होता.
पहाटे सौ. व श्री अमित साळवे दांपत्याच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर पुजारी अनिल डवरी यांच्या उपस्थितीत महापूजा संपन्न झाली. विणा पूजनाचा विधी वारकरी व मान्यवरांच्या हस्ते पार पडताच मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची अखंड रांग लागली होती. शासकीय सुट्टी आणि अनुकूल हवामानामुळे यंदा भाविकांची उपस्थिती विशेष लक्षणीय होती. गर्दी असूनही दर्शन व्यवस्था शिस्तबद्ध राहिल्याने भाविकांनी शांततेत दर्शनाचा लाभ घेतला.
यात्रेनिमित्त मंदिरात भजन, हरिपाठ आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. मंदिर परिसरात पूजा साहित्य, नारळ, साखर, कापूर तसेच विविध खाद्यपदार्थांची दुकाने सजली होती. निपाणी आणि परिसरातील अनेक दिंड्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात मंदिरात आगमन करून विठ्ठलाचे दर्शन घेतले. मंदिर प्रशासनाने सर्व दिंड्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.
भाविकांच्या सेवेसाठी विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांकडून मोफत खिचडी, दूध, केळी, लाडू यांसह प्रसादाचे वाटप करण्यात आले. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी साळवे कुटुंबीय, ग्रामपंचायत प्रशासन, निपाणी ग्रामीण पोलीस, गावातील युवक मंडळे आणि वारकरी संप्रदायातील कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध व्यवस्था उभारली होती.
यंदा वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. पानंद रस्त्यावर दुचाकी, तर नाजूक नगर परिसरात चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची सोय केल्यामुळे कोणताही अडथळा न येता भाविकांना दर्शनासाठी सहज ये-जा करता आली. या नियोजनाचे भाविकांकडून विशेष कौतुक करण्यात आले.