निपाणी नगरी वृत्तसेवा (22)
विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जोपासना व्हावी, निवडणूक प्रक्रियेचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे आणि भावी जबाबदार नागरिक घडावेत या उदात्त उद्देशाने निपाणी मराठा मंडळ हायस्कूल, निपाणी येथे तब्बल 15 दिवसांची लोकशाही निवडणूक प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध, पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वीरित्या राबविण्यात आली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक अनुभव देणारा हा अभिनव उपक्रम सर्वांच्या विशेष कौतुकास पात्र ठरला.
निवडणूक कार्यक्रम
दि. 06 जुलै 2026 – निवडणुकीची अधिकृत घोषणा, दि. 08 जुलै 2026 – उमेदवारी अर्जांचे वितरण, दि. 10 जुलै 2026 – उमेदवारी अर्ज दाखल, दि. 11 जुलै 2026 – अर्जांची छाननी, दि. 13 जुलै 2026 – अर्ज माघार, दि. 14 व 15 जुलै 2026 – प्रचार कालावधी दि. 16 जुलै 2026 – मतदान, दि. 17 जुलै 2026 – निकालाबाबत उत्कंठा, दि. 18 जुलै 2026 – मतमोजणी व विजयी उमेदवारांची घोषणा, दि. 20 जुलै 2026 – शपथविधी व खातेवाटप
या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थ्यांना लोकप्रतिनिधींची निवडणूक प्रत्यक्षात कशी पार पडते याचे वास्तव प्रशिक्षण देण्यात आले. उमेदवारी अर्ज भरणे, अनामत रक्कम (डिपॉझिट) जमा करणे, अर्जांची छाननी, अर्ज मागे घेणे, आघाडी (युती) करणे, इतर उमेदवारांना पाठिंबा जाहीर करणे, प्रचाराचे नियोजन करणे, मतदारांशी संवाद साधणे, निवडणूक आचारसंहितेचे पालन करणे अशा प्रत्येक टप्प्याचा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला.
प्रचार कालावधीत उघड प्रचार, छुपा प्रचार, राजकीय रणनीती, लोकशाही प्रचारपद्धती, प्रभावी भाषणकला आणि मतदारांशी संवाद या सर्व बाबींचे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. प्रत्येक वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधींनी आपली भूमिका प्रभावीपणे मांडली. काही वर्गांमध्ये आरक्षित जागांची संकल्पनाही राबविण्यात आली. त्यामुळे संपूर्ण शाळेत वास्तविक लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीप्रमाणे उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.
दि. 16 जुलै 2026 रोजी मतदान प्रक्रियेचे उद्घाटन निपाणी नगरपालिकेचे माजी नगरसेवक मा. श्री. संदीप चावरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. मतदानाच्या दिवशी 100 टक्के मतदान नोंदविण्यात आले, ही या उपक्रमाची विशेष अभिमानास्पद बाब ठरली. कामानिमित्त गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोन दिवस अगोदर पोस्टल मतदानाचा नमुना दाखवून प्रत्यक्ष पोस्टल मतदानाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. मतदानानंतर मतपेट्या अधिकृत पद्धतीने सीलबंद करून सुरक्षित ठेवण्यात आल्या.
दि. 18 जुलै 2026 रोजी मतमोजणी सुरू होताच संपूर्ण शाळेत उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले. प्रत्येक फेरीनंतर निकाल जाहीर करण्यात येत होता आणि प्रत्येक घोषणेनंतर विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच वाढत होता. अखेरीस लोकशाही पद्धतीने विजयी उमेदवारांची घोषणा करून त्यांना निवड प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
निवडून आलेले विद्यार्थी प्रतिनिधी– शाळास्तरीय प्रतिनिधी, GS (विद्यार्थी प्रतिनिधी) – साईप्रसाद आनंदराव धडके (बिनविरोध निवड),LR (विद्यार्थिनी प्रतिनिधी) – श्वेता विनोद देशमुख (त्रिशंकू परिस्थितीत निवड) वर्ग प्रतिनिधी इयत्ता 10 वी अ सुहानी कदम यश दळवी इयत्ता 10 वी ब अनुष्का चौगुले युग चौगुले इयत्ता 9 वी अ, तंजिला नाईकवडी, कार्तिक बामणे, इयत्ता 9 वी ब, अंकिता सुतार,विनायक गौड,इयत्ता 8 वी अ साक्षी पोवार आयुष पोळ इयत्ता 8 वी ब- पूर्वा मधाळे मंथन रामणकट्टी सर्व विजयी उमेदवारांना अधिकृत निवड प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
शपथविधी व विद्यार्थी मंत्रिमंडळाची स्थापना
दि. 20 जुलै 2026 रोजी निपाणी मराठा मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. रवींद्र रघुनाथराव कदम यांच्या हस्ते विद्यार्थी मंत्रिमंडळाचा भव्य शपथविधी सोहळा संपन्न झाला. शासनाच्या धर्तीवर 7 कॅबिनेट मंत्री व 9 राज्यमंत्री अशी विद्यार्थी मंत्रिमंडळाची रचना करण्यात आली. अर्थ, स्वच्छता, आरोग्य, शिस्त, सहल, क्रीडा, सांस्कृतिक, परीक्षा विभाग आदी विविध खात्यांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक कॅबिनेट मंत्र्यास सहाय्यक म्हणून राज्यमंत्र्यांची नियुक्ती करून प्रत्यक्ष शासनव्यवस्थेचा उत्कृष्ट नमुना विद्यार्थ्यांसमोर उभा करण्यात आला. या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकशाही शासनव्यवस्था, मंत्रिमंडळाची रचना, प्रशासनाची कार्यपद्धती, सामूहिक नेतृत्व, जबाबदारी आणि निर्णयप्रक्रिया यांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले.
उपक्रमाचे वैशिष्ट्य
ही निवडणूक केवळ मतदानापुरती मर्यादित न राहता अधिकृत घोषणा ते शपथविधी आणि खातेवाटप या संपूर्ण लोकशाही प्रक्रियेचे वास्तव स्वरूप विद्यार्थ्यांसमोर उभे करणारी ठरली. त्यामुळे नेतृत्वगुण, शिस्त, संघटन कौशल्य, जबाबदारी, सामाजिक बांधिलकी, लोकशाही मूल्ये आणि संविधानाविषयी आदर या गुणांचा विद्यार्थ्यांमध्ये प्रभावी विकास झाला. संपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक, प्रेरणादायी, संस्मरणीय आणि लोकशाही शिक्षणाचा उत्कृष्ट आदर्श ठरला.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक श्री. डी. डी. हळवणकर यांनी मार्गदर्शन केले. निवडणूक कार्यकारी अधिकारी श्री. जे. आर. खपले यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत यशस्वीपणे पार पाडली. तसेच हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. व्ही. व्ही. पत्की, श्री. एस. डी. साखळकर, श्री. ए. एम. यादव, श्री. के. एल. कांबळे, श्री. के. एस. देसाई, सौ. अर्चना पाटील, सौ. पूजा पाटील, सौ. प्रियांका पाटील, सौ. चौगुले मॅडम, सौ. धनश्री पाटील तसेच लेखनिक श्री. मुकुंद कोरे यांनी मोलाचे सहकार्य केले. निपाणी मराठा मंडळ हायस्कूल, निपाणी येथे राबविण्यात आलेली ही निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी लोकशाही शिक्षणाचा एक आदर्श आणि अनुकरणीय नमुना ठरली आहे.