निपाणी नगरी वृत्तसेवा (4)
संकेश्वर बायपास ते कोगनोळी टोलनाक्या जवळील एकूण 37 किलोमीटरच्या पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सहा पदरीकरणाचे काम अत्यंत वेगाने सुरू असून आतापर्यंत 80 ते 85 टक्के काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. या महामार्गावरील निपाणी खरी कॉर्नर परिसरात स्थानिक नागरिकांच्या मागणीचा आदर करत नवीन तीन उड्डाणपुलाची उभारणी केली जात आहे. त्यामध्ये महात्मा गांधी रुग्णालयासमोर, खरी कॉर्नर, व शिरगुपी रोड येथील तीन उड्डाणपूलाचे काम युद्ध पातळीवर चालू होते. पण नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि मशीनच्या सहाय्याने काम करताना अनावधानाने मशीनचा धक्का मुख्य भागाला लागल्यामुळे पुलाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग बाधित झाला होता. मात्र, प्रशासनाची पूर्वदक्षता आणि सुव्यवस्थित वाहतूक नियोजनामुळे कोणतीही विपरीत घटना न घडता वाहतूक पूर्ववत व सुरक्षितपणे सर्व्हिस रोडवरून सुरू आहे.
राष्ट्रीय पथकाकडून गुणवत्तेचे कौतुक
दुर्घटनेची दखल घेत दिल्ली येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) विशेष पथकाने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान पथकाने वापरण्यात आलेले मुरुम, सिमेंट आणि भिंतीचे इतर सर्व साहित्य उच्च दर्जाचे असल्याचे स्पष्ट केले. सन २०२२ पासून सुरू असलेल्या या प्रकल्पाचे आतापर्यंतचे काम उत्तम दर्जाचे झाल्याचा सकारात्मक अहवाल या पथकाने दिला आहे. सुरक्षा नियमांचे पालन करत बाधित भिंतीचा ५ ते ७ मीटर भाग काढून तेथे पुन्हा नव्याने आणि अधिक मजबूत बांधकाम केले जाणार आहे.
कामात प्रगती आणि नागरिकांच्या सोयीला प्राधान्य
या भागात काम करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वीच जागा ताब्यात मिळाली होती. गांधी रुग्णालय आणि खरी कॉर्नर व शिरगुपी रोड लगत च्या परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी दोन अतिरिक्त उड्डाणपूल उभारले जात आहेत. एकूण ३७ किलोमीटरच्या रस्त्यासाठी ७९३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. संकेश्वर बायपास ते कोगनोळी टोलनाक्या दरम्यान प्रस्तावित २१ उड्डाणपुलांपैकी १८ पुलांचे काम पूर्ण झाले असून केवळ तीन पुलांचे काम अंतिम टप्प्यात आहे. पावसाची उघडीप मिळताच दुरुस्ती आणि उर्वरित काम पूर्ण करून हा महामार्ग लवकरच पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असा विश्वास निपाणी नगरीच्या वार्ताहरांशी बोलताना अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.