निपाणी नगरी वृत्तसेवा (15) श्रीपेवाडी
येथील श्री. जी. एम. संकपाळ हायस्कूल व प्राथमिक शाळेत १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, शिस्तबद्ध परेड व देशभक्तीपर वातावरणामुळे संपूर्ण शाळा परिसर भारावून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक कै. संकपाळ साहेब व संस्थापिका कै. संकपाळ काकू यांच्या पुतळ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली. त्यानंतर महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून वंदेमातरम् गीताचे गायन करण्यात आले. ध्वजपूजन व ध्वजारोहणा नंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व ध्वजगीत सादर केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध परेड व कवायतीचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. अनेक विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करून देशभक्ती, राष्ट्रप्रेम व नागरिक म्हणून असलेल्या कर्तव्यांची जाणीव करून दिली.
कार्यक्रमात इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच स्काऊट व गाईड मधील गुणवंत विद्यार्थी, निबंध व हस्ताक्षर स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. शैक्षणिक प्रवाहात आर्थिक अडचणी अडथळा ठरू नयेत, या भावनेतून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाबरोबरच शिस्त, देशप्रेम, सामाजिक बांधिलकी व प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक दगडूअण्णा चेंडके होते. प्रमुख पाहुणे म्हणून हालशुगर कारखान्याचे संचालक आनंदराव यादव, सेवानिवृत्त सुभेदार विनायक नार्वेकर, एक्स-आर्मीमॅन संतोष माळी व प्रविणबाबू मिरजकर उपस्थित होते. तसेच संस्थेचे संचालक गजानन शिंदे यांच्यासह जत्राट व श्रीपेवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक भास्कर पाटील, शिवाजी नराटे, भागेश शिरोळे, संतोष शिरोळे, संतोष चेंडके, संदिप जबडे, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक हायस्कूलचे मुख्याध्यापक जे. एस. जाधव यांनी केले, तर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. डी. पोवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एच. पाटील यांनी केले.
विद्यार्थ्यांची शिस्तबद्ध उपस्थिती, परेड कवायतीचे आकर्षक सादरीकरण, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आलेली मदत यामुळे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.