निपाणी नगरी वृत्तसेवा (15)श्रीपेवाडी
कुर्ली येथील श्री क्रांतिवीर संगोळी रायान्ना युवक मंडळ व धनगर समाज, कुर्ली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या २८८ व्या श्री क्रांतिवीर संगोळी रायान्ना जयंती व ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत श्री. जी. एम. संकपाळ हायस्कूल व प्राथमिक शाळा, श्रीपेवाडी येथील विद्यार्थी कु. परितोष पाटील याने प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले.
वक्तृत्व स्पर्धेत परितोष पाटील याने आत्मविश्वासपूर्ण व प्रभावी शैलीत आपले विचार मांडत उपस्थितांची मने जिंकली. त्याच्या अभ्यासपूर्ण मांडणीला, प्रभावी भाषा शैलीला आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला परीक्षका कडून विशेष दाद मिळाली. या उल्लेखनीय यशाबद्दल त्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
परितोषच्या या यशामुळे श्री. जी. एम. संकपाळ हायस्कूल व प्राथमिक शाळा, श्रीपेवाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याच्या यशाबद्दल शाळा, पालक, शिक्षकवृंद तसेच श्रीपेवाडी परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
परितोषच्या यशामागे संस्थेचे चेअरमन डॉ. अशोक पुजारी, व्हा. चेअरमन श्री.अविनाशदादा पाटील, सर्व संचालक मंडळ व ट्रस्टी मेंबर्स, तसेच हायस्कूलचे मुख्याध्यापक जे. एस. जाधव व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. डी. पोवार यांचे प्रोत्साहन लाभले.
तसेच मराठी विषयाच्या शिक्षिका के. बी. गायकवाड यांचे वक्तृत्व स्पर्धेच्या तयारीसाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थी परितोषचे पालक विनायक पाटील तसेच विश्वास परीट यांचेही मार्गदर्शन व प्रोत्साहन त्याला मिळाले. याशिवाय शाळेतील सर्व शिक्षकवृंदाचे मार्गदर्शन व सहकार्य त्याच्या यशासाठी महत्त्वपूर्ण ठरले.
परितोषच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थ्यांनी त्याचे अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
“मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठे यश संपादन करू शकतात,” याचे प्रेरणादायी उदाहरण परितोष पाटील याच्या यशातून अधोरेखित झाले आहे.