निपाणी नगरी वृत्तसेवा (15)
निपाणी : संत श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त निपाणी मराठा मंडळाच्या वतीने महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात निपाणी शहर व परिसरातील भाविकांसह विविध शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
श्री गजानन महाराजांची महाआरती सौ. संगीता रवींद्र कदम व सौ. ज्योती राजेश कदम यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी शेगाव गजानन महाराज सेवा संघातील पदाधिकारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. गजानन महाराजांच्या नामस्मरणासह आरतीमध्ये सहभागी होत अनेक भाविकांनी महाराजांचे दर्शन घेतले.
या कार्यक्रमासाठी बालवाडी, मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा, निपाणी मराठा मंडळ हायस्कूल तसेच मराठा मंडळ आयटीआय कॉलेज, निपाणी येथील अध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेतील सर्व घटकांनी कार्यक्रमात सहभागी होत पुण्यतिथी सोहळ्याचा लाभ घेतला.
महाआरतीनंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. महाप्रसादासाठी निपाणी शहरासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले असून हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
संत गजानन महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या उपक्रमातून श्रद्धा, सेवा आणि समाजातील एकोप्याची भावना जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मराठा मंडळाचे पदाधिकारी, शिक्षकवर्ग, कर्मचारी, विद्यार्थी, सेवा संघाचे कार्यकर्ते व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.