निपाणी नगरी वृत्तसेवा..(7)
निपाणी येथील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने शाळेमध्ये जिल्हा न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली पोक्सो, बाल अपहरण आणि बालमजुरी या विषयांवर विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून निपाणी तालुका न्यायालयातील न्यायाधीश श्रीमती सुमलता बेनिकल या उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी पोक्सो कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली. या कायद्याचा उद्देश मुलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणे आणि दोषींना कठोर शिक्षा देणे हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच विद्यार्थ्यांना बाल अपहरणापासून सावध राहणे, अनोळखी व्यक्तींशी संपर्क टाळणे आणि कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास त्वरित पालक किंवा शिक्षकांना कळवणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेले निपाणीचे क्रिमिनल वकील श्री प्रसाद कदम यांनी अंतर्गत बालमजुरी हा कायद्याने गुन्हा असल्याची माहिती देत प्रत्येक मुलाला शिक्षणाचा आणि सुरक्षित बालपणाचा अधिकार असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमास निपाणी ईस्ट झोनचे सी आर सी श्री तराळ हे ही उपस्थित होते.
शाळेच्या प्राचार्या सौ स्नेहा आर घाटगे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना म्हणाल्या की मॉडर्न इंग्लिश शाळेमध्ये आम्ही ही सर्व महत्त्वाची माहिती मुलांच्या मध्ये वेळोवेळी देत आलेलो आहोत. जेणेकरून त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण होईल
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातून बालसुरक्षा आणि कायद्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ कला एस मेणसे यांनी केले. ज्योती खोत यांनी शासनाकडून पाठविण्यात आलेले जागरूकता वर आधारित व्हिडिओज मुलांना दाखविले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने सौ ऋतुजा राज देसाई यांनी केला.
हा कार्यक्रम पार पडण्यासाठी शाळेतील समाज विज्ञान शिक्षका सौ डी पी पाटील, सौ वर्षा करगुपी, शाळेतील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.