निपाणी नगरी वृत्तसेवा..(7)
श्री महावीर दिगंबर जैन बोर्डिंग ट्रस्ट संचलित प्रशालेत कायदेविषयक जनजागृती व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन. श्रीनिकेतन मराठी माध्यम शाळा व शांतिनिकेतन मराठी माध्यम हायस्कूल निपाणी येथे कर्नाटक सरकार यांच्या सूचने नुसार विद्यार्थ्या साठी कायदेविषयक जनजागृती व प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना बालका वरील लैंगिक अपराधा पासून संरक्षण कायदा 2012 ( पॉक्सो ) बालमजुरी ( प्रतिबंध व नियमन ) कायदा 1986 बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 तसेच वेठबिगारी पद्धती ( निर्मूलन ) कायदा 1976 या महत्वपूर्ण कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी निपाणी न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ वकील विभावरी धनाजी निर्मळे यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना पॉक्सो कायद्याचे कलम 3, 4, 7 व 8 याविषयी माहिती देताना अल्पवयीन मुला वरील लैंगिक अत्याचार हा गंभीर गुन्हा असून त्यासाठी कठोर शिक्षा असल्याचे स्पष्ट केले तसेच अशा घटनांची माहिती लपविणे देखील कायद्याने अपराध आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांना पालकांना सतर्क केले.
त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अलका भोसले, शाळेचे शिक्षक श्री जितेंद्र कांबळे श्री अरुण शिंदे माया कांबळे यांनी देखील मुलांच्यावर होणारे लैंगिक अत्याचार बालमजुरी याविषयी सविस्तर माहिती पालकांना आणि विद्यार्थ्यांना दिली.
पॉक्सो कायद्यातील कलम 3 व 4 ( लैंगिक अत्याचार व त्यावरील शिक्षा ) तसेच कलम 7 व 8 ( लैंगिक छळ व त्यावरील शिक्षा ) याविषयी सोप्या शब्दात माहिती देण्यात आली कोणत्याही प्रकारचा अनुचित स्पर्श, छेडछाड किंवा मानसिक त्रास सहन न करता त्वरित पालक व शिक्षक किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा ते त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अधिकाराची जाणीव ठेवून निर्भयपणे व जागरूकपणे वागावे असा संदेश त्यांनी दिला.
या कार्यक्रमाला निपाणी न्यायालयाच्या वकील विभावरी निर्मळे, शांतिनिकेतन हायस्कूलचे चेअरमन श्री कपूरचंद इंगळे, ट्रस्टी श्री मिलिंद चौगुले, श्रीनिकेतन शाळेचे चेअरमन डॉक्टर अनिल ससे, शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सी बी कुरबेट्टी, शाळेचे सेक्रेटरी श्री प्रदीप पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका अलका भोसले सर्व शिक्षक वृंद पालक वर्ग विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात नाड गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रस्ताविक व आभार प्रदर्शन श्री जितेंद्र कांबळे यांनी मानले.