निपाणी नगरी वृत्तसेवा (24) अर्जुननगर
एन.सी.सी. ही केवळ एक संघटना नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाची प्रभावी शाळा आहे. शिस्त, नेतृत्वगुण, संघभावना आणि देशसेवेचे मौल्यवान धडे येथे दिले जातात. कॅडेट्सना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे कार्य एन.सी.सी.च्या माध्यमातून प्रभावीपणे पार पडते. प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून संकटांना निर्भयपणे सामोरे जाण्याची ताकद निर्माण होते. आजच्या तरुणांनी भारतीय सैन्य दलात भरती होऊन देशसेवेला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन निवृत्त कर्नल प्रशांत पवार यांनी केले.
राष्ट्रीय कॅडेट्स कोअरच्या निरोप समारंभ तसेच ‘अग्निवीर’ योजनेत भरती झालेल्या कॅडेट्सच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी ‘व्हाईट आर्मी’चे संस्थापक अशोक रोकडे यांनीही उपस्थित पत्रकार बंधूंच्या निर्भीड कार्याबद्दल सद्भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. जी. डी. इंगळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “एन.सी.सी.च्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात अंतर्बाह्य सकारात्मक बदल घडतो. शिस्त हीच जीवनाला सुंदर बनवणारी मूलभूत मूल्य आहे.” त्यांनी समाजात अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या आणि सर्वसामान्य जनतेला जागृत करणाऱ्या वार्ताहारांचे विशेष कौतुक केले. समाजात सुशासन प्रस्थापित करण्यासाठी आणि योग्य दिशा देण्यासाठी पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. पत्रकार श्री मधुकर भोसले यांनी संस्थेचे अध्यक्ष व प्राचार्या इंगळे यांचे विशेष आभार मानले व एन.सी.सी युनिटचे कौतुक केले.
कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार एन.सी.सी. विभागाचे केअरटेकर प्रा. निरंजन जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच ‘अग्निवीर’ योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा आणि पत्रकार मधुकर पाटील अमोल नागराळे रमजान कराडे दत्तात्रय पाटील के.जी मुल्ला, सोमनाथ खोत गणेश घोडके, किरण पाटील यांचा सन्मानचिन्ह देऊन, कर्नल प्रशांत पवार व प्राचार्या डॉ. इंगळे यांच्या हस्ते करण्यात आला. कॅडेट्स अदिती घस्ते व अथर्व माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. एस. पी. जाधव, पर्यवेक्षक मेजर डॉ. अशोक डोनर, सेकंड ऑफिसर शिवानंद चौगुले, सागर मगदूम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह तसेच खजिनदार सुबोधभाई शाह यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनिल लट्टे, प्रशांत कुंभार, सिद्धू बेरड, शिवदास चव्हाण, किरण घोडके, संतोष वागळे शंकर खोत, यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन ज्योती भोंगाळे, धैर्यशील कुलकर्णी आणि प्रणाली सूर्यवंशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. निरंजन जाधव यांनी मानले.