निपाणी नगरी वृत्तसेवा.(15)
दि. 14 एप्रिल 2026 रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून शिप्पूर येथे “आम्ही शिपूरकर” पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डाॅ. अच्युत माने सर होते. प्रमुख व्यक्ती म्हणून मराठी विषयाचे व्यासंगी प्रा. नानासाहेब जामदार उपस्थित होते. त्याचप्रमाणे लेखक प्रा.मंगलदास शिपूरकर, सौ.जयश्री शिपूरकर व्यासपीठावर उपस्थित होते.
सुरुवातीला लहान मुलांच्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेले होते. त्या दरम्यान सौ. शोभा विवेक कांबळे यांनी जयंतीच्या निमित्ताने आपले विचार मांडले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला आणि उपस्थित ग्रामस्थांमधील आम्ही शिपूरकर या पुस्तकातील व्यक्तिलेखातील सर्व मान्यवरांचा सत्कार मा. डॉ. अच्युत माने व प्रा.नानासाहेब जामदार यांच्या शुभहस्ते संविधान उद्देशिका, आम्ही शिपूरकर पुस्तक आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये गावकामगार पोलीस पाटील-बळवंत पाटील यांचे चिरंजीव आनंदराव पाटील व सौ. यशोदा पाटील, मसू कांबळे यांचा मुलगा कर्णकुमार व निर्मला, प्रा. बाळासाहेब इंगळे, शिप्पूर गावातील प्रसिद्ध दुकानदार गजानन खराडे, त्यांच्या पत्नी सौ रंजना; शिवाजी बाळू कांबळे यांचा मुलगा मुकुंद कांबळे शिप्पूर गावातील आध्यात्मिक वारसा जपणारे दत्तात्रेय रांगोळे; शहाजी पाटील यांच्या पत्नी रत्नाबाई आणि प्रकाश पाटील, भाऊराव कांबळे, दत्ता खराडे आणि इतर ग्रामस्थांचा आम्ही शिपूरकर या पुस्तकाची प्रत देऊन हा सत्कार सोहळा पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शिप्पुरातील फुले, शाहू, आंबेडकर वाचनालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य मुकुंद कांबळे यांनी केले. त्यानंतर प्रकाश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. लेखक मंगलदास शिपूरकर यांनी शिप्पूर गावचा इतिहास थोडक्यात सांगितला आणि मातृपितृ ॠणाप्रमाणे शिप्पूर गावचे ऋणदेखील व्यक्त केले. प्रा.नानासाहेब जामदार यांनी लेखकाचे भावविश्व सविस्तरपणे मांडले.
अध्यक्ष डॉ. अच्युत माने म्हणाले, “शिप्पूर गावाची कीर्ती आणि इतिहास लेखकाने या पुस्तकात मांडलेला आहे. पुस्तकातील बारा व्यक्तिमत्त्वाचे कार्य गावच्या प्रतिनिधिक स्वरूपात लेखकाने मांडलेले आहे.” त्याचप्रमाणे प्रा. इंगळे आणि आपण एकत्र देवचंद कॉलेजमध्ये कार्य केलेले आहे, या जुन्या आठवणींना उजाळा दिला. सध्याच्या काळात वाचन संस्कृती मागे पडत आहे परंतु अलीकडील दोन महिन्याच्या कालावधीत माझे चार विद्यार्थी लेखक झालेले आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो. त्याचप्रमाणे अलीकडील तरुण पिढीसमोर डॉ. बाबासाहेबांचे चिरंतन आदर्श विचार या जयंतीच्या निमित्ताने मांडले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. नवीजन कांबळे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त घेतलेल्या क्रिकेट स्पर्धेचे बक्षीसवितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस शास्त्री सर, हाजी सर, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस अमर कांबळे, तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्रवीण कांबळे आणि चषकाची देणगी विवेक कांबळे यांच्याकडून करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमास उपस्थित ग्रामस्थांमध्ये फुले शाहू आंबेडकर वाचनालयाचे सर्व पदाधिकारी आणि संघर्ष ग्रुप शिप्पूरचे सर्व सदस्य उपस्थित होते.