निपाणी नगरी वृत्तसेवा (17) प्रतिनिधी
निपाणीत मोकाट जनावरांचा हैदोस; श्रीराम सेना कर्नाटकचा पालिकेवर धडक मोर्चा 7 दिवसांत कारवाई न झाल्यास जनावरे पालिकेत बांधण्याचा ‘अंतिम इशारा’ देण्यात आला आहे.
निपाणी शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट जनावरांच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त झाले असून, यामुळे होणारी जीवित व वित्तहानी थांबवण्यासाठी श्रीराम सेना (कर्नाटक) व त्रस्त निपाणीकरांच्या वतीने नगरपालिका प्रशासनाला कडक इशारा देण्यात आला. यासंदर्भात श्रीराम सेनेच्या शिष्टमंडळाने नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
शहराचे जनजीवन विस्कळीत…
निवेदनात नमूद केल्यानुसार, निपाणी शहरातील मुख्य चौक, बसस्थानक परिसर आणि निवासी भागात जनावरांचे कळप ठाण मांडून असतात. यामुळे शाळकरी मुले, महिला आणि वृद्धांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. या जनावरांच्या धडकेमुळे अनेक अपघात घडले असून काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. तसेच गुरुवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात ही जनावरे शेतकऱ्यांच्या मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत.
श्रीराम सेनेने प्रशासनाकडे आक्रमक मागण्या केल्या आहेत. यात प्रामुख्याने जनावरे मोकाट सोडणाऱ्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर ‘सार्वजनिक शांतता भंग’ आणि ‘निष्काळजीपणा’ या कलमांखाली फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. तसेच पकडलेल्या जनावरांचे तातडीने पांजरपोळ किंवा गो-शाळेत पुनर्वसन करून मालकांकडून मोठा दंड वसूल करावा, असेही निवेदनात म्हटले आहे.
प्रशासनाला ७ दिवसांची मुदत
“प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास ७ दिवसांनंतर आम्ही सर्व मोकाट जनावरे गोळा करून ती थेट नगरपालिका कार्यालयाच्या आवारात आणून बांधू. त्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाला नगरपालिका प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल,” असा कडक इशारा श्रीराम सेनेच्या वतीने देण्यात आला.
निवेदन देताना श्रीराम सेनेचे चिकोडी जिल्हा कार्याध्यक्ष अमोल चेंडके, निपाणी तालुका प्रमुख अजित पारळे, तालुका कार्याध्यक्ष बबन निर्मले, अक्षय वाघेला, योगेश चौगुले, वैभव भाट, श्रीनंदन तारळे, प्रशांत घोडके, विशाल जाधव, विजय पाथरूट, आकाश मल्हाडे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.