तवंदी घाटात एका टँकरला लागली आग!
स्पिरिट वाहतूक करणाऱ्या टँकरमध्ये शॉर्टसर्किट!

निपाणी नगरी प्रतिनिधी (5)
मुंबईहून बेंगलोर कडे निघालेल्या टँकरला तवंदी घाटात हॉटेल कावेरीच्या समोर शॉर्टसर्किटने आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून आर्थिक नुकसान मात्र मोठे झाले आहे.
घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार आज बुधवार दिनांक 5 मार्च रोजी दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान झालेल्या टँकर मधील बॅटरीच्या शॉर्टसर्किटने आग लागल्याने प्राथमिक अंदाजानुसार टँकर मधील मालाचे सुमारे 20 ते 25 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. टँकर मध्ये स्पिरिट भरले होते.
घटनेची माहिती समजताच संकेश्वर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी व एस एम आवताडे पेट्रोलिंगच्या विजय दांईगडे, अक्षय सारापुरे व इतर सदस्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत अग्निशामक दलास पाचारण केल्यामुळे मोठी हानी टळल्याचे बोलले जात आहे.
अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दुपारच्या वेळी आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात आणून शर्थीचे प्रयत्न करत मोठी वित्तहानी टाळली. त्यामुळे निपाणी अग्निशामक दलाचे अधिकारी कौजलगी व त्यांच्या सहकाऱ्यांचे परिसरात कौतुक होत आहे.