निपाणी नगरी वृत्तसेवा (24)
अंतुर्ली-तांबळे (ता. भुदरगड) येथील अथणी शुगर्स लि., भुदरगड युनिट च्या आगामी गळीत हंगामातील मिल रोलर पूजन व मिल जोडणी सोहळा कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक (एम. डी.) श्री. श्रीनिवास श्रीमंत पाटील यांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडला.
यावेळी बोलताना व्यवस्थापनाने स्पष्ट केले की, आगामी हंगामात कारखान्याने 4 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, हे उद्दिष्ट यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करावे. मागील हंगामात सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची सर्व बिले वेळेत अदा करण्यात आली असून, आगामी हंगामासाठी तोडणी व वाहतूक यंत्रणेचे करार पूर्ण झाले आहेत. कारखाना प्रशासनाने आगामी गळीत हंगामाची संपूर्ण तयारी पूर्ण केली असून परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या उसाची नोंद संबंधित शेती कार्यालयाकडे वेळेत करून कारखान्यालाच संपूर्ण ऊस पुरवठा करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी स्वागत व आभार श्री. बाबासाहेब देसाई यांनी केले. या मिल रोलर पूजन प्रसंगी कारखान्याचे एम. डी. श्री. श्रीनिवास श्रीमंत पाटील यांच्यासह चिफ इंजिनीअर श्री. नामदेव भोसले, चिफ केमिस्ट श्री. प्रकाश हेडूरे, मुख्य शेती अधिकारी श्री. राजाराम आमते, चिफ अकाऊंटंट श्री. जमीर मकानदार, वरिष्ठ अधिकारी व कामगार प्रतिनिधी, तसेच भागातील प्रमुख शेतकरी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.