निपाणी नगरी वृत्तसेवा (24)
कोगनोळी येथील इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व आर्ट्स प्रि मिलिटरी कॉलेज व युवा सायन्स अकॅडमी या सैनिकी शाळेत निवासी विद्यार्थ्यांची शिक्षक पालक सभा संपन्न झाली . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कुमार पाटील हे होते. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेच्या अध्यक्षा रेखा पाटील, प्राचार्य अनमोल पाटील व मुख्याध्यापिका कोमल पाटील हे उपस्थित होते. प्रारंभी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अक्षता कांबळे यांनी केले. नंतर उपस्थित मान्यवरांच्या अमृत हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार करून चित्रकला स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. मुख्याध्यापिका कोमल पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना ज्ञानाने बुद्धी विकसित होते पण संस्कारांनी व्यक्तिमत्व उजळते . ज्ञान आणि संस्कार यांचा संगमच खऱ्या शिक्षणाची ओळख आहे असे त्यांनी मत व्यक्त केले.
प्राचार्य अनमोल पाटील यांनी मनोगतात शिक्षणाचे खरे यश केवळ गुणपत्रिकेतील गुणांमध्ये नसते तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात असते म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेनुसार शिकवणे व त्याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे सांगितले.
सचिव कुमार पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ करिअर घडविण्याची नाही तर चारित्र्य घडविण्याचीही गरज आहे. उत्तम गुणांपेक्षा उत्तम गुणवैशिष्ट्ये अधिक महत्त्वाची असतात अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी संकुलातील सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद परीट यांनी केले तर आभार नितीन पाटील यांनी मानले.