निपाणी नगरी वृत्तसेवा (16)
निपाणी परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास आणि सामाजिक जोडणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. येथील जत्राटवेस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर ते सोमनाथ मंदिर लखनापूर रोडपर्यंतच्या रस्ता सुधारणेसाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या महत्त्वपूर्ण विकासकामाचा भव्य शुभारंभ खासदार प्रियंका जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी स्थानिक दलित समाजाच्या वतीने खासदार जारकीहोळी यांचा विशेष सत्कार करत या विकास कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कामाचा प्रारंभ करण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आदरपूर्वक पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर वाद्यांच्या गजरात आणि पारंपरिक पद्धतीने श्रीफळ वाढवून, खासदारांनी टिकाव मारून कामाची अधिकृत सुरुवात केली.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना खासदार प्रियांका जारकीहोळी म्हणाल्या की, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांच्या दूरदृष्टी आणि मार्गदर्शनाखाली निपाणी मतदारसंघात खासदार निधीतून अनेक कल्याणकारी कामे सुरू आहेत. हा रस्ता केवळ दळणवळणाचा मार्ग नसून या भागातील नागरिकांचे जीवनमान सुकर करणारा दुवा ठरेल. “ग्रामीण व शहरी भागांना जोडणारे रस्ते हे प्रगतीचे मुख्य माध्यम असून, या कामांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवणे आणि प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा सन्मानाने मिळवून देणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. हे काम अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण केले जाईल, जेणेकरून स्थानिक नागरिकांची व प्रवाशांची वर्षानुवर्षांची गैरसोय दूर होईल. येत्या काळातही मतदारसंघातील सर्व घटकांना न्याय देणारी विकासकामे राबविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत लोकेश घस्ते यांनी केले. या ऐतिहासिक शुभारंभा प्रसंगी बुडा (BUDA) अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, युवा नेते पंकज पाटील, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील, सुजय पाटील, सुप्रिया पाटील, दिलीप पठाडे, अनिता पठाडे,एडवोकेट संजय चव्हाण, अरुण आवळेकर, रवींद्र श्रीखंडे, जीवन घस्ते, प्रवीण हेगडे, युवराज पोळ, विजय शेटके, किरण कोकरे यांच्यासह दलित समाजातील प्रमुख बांधव आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.