निपाणी नगरी वृत्तसेवा (17)
श्री बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित श्री पार्श्वमती विद्यालय, अक्कोळ येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व चारित्र्य संवर्धनाच्या उद्देशाने “नैतिक मूल्ये हेच विद्यार्थ्यांचे खरे धन” या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. ऐश्वर्या खांडके यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी नैतिक मूल्यांचे महत्त्व अत्यंत प्रभावी उदाहरणांसह समजावून सांगितले.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, शिक्षणाचा खरा उद्देश केवळ परीक्षेत अधिक गुण मिळविणे नसून चांगले चारित्र्य, उत्तम संस्कार, सामाजिक जाणीव आणि जबाबदार नागरिक घडविणे हा आहे. ज्ञाना सोबत प्रामाणिकपणा, शिस्त, वेळेचे नियोजन, कष्ट करण्याची तयारी, आत्मविश्वास, सकारात्मक विचार, पालक व शिक्षकाप्रती आदर, राष्ट्रप्रेम आणि समाजसेवेची भावना या मूल्यांचा स्वीकार केल्यास प्रत्येक विद्यार्थी आयुष्यात निश्चित यशस्वी होऊ शकतो.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर अपरिहार्य असला तरी त्याचा विवेकपूर्ण व मर्यादित वापर करणे आवश्यक आहे. वेळेचा अपव्यय टाळून नियमित अभ्यास, दर्जेदार पुस्तके वाचणे, वर्तमानपत्रांचे वाचन, योग, व्यायाम, ध्यान आणि चांगल्या मित्रांची संगत यामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक सक्षम बनते. जीवनात कोणतेही ध्येय गाठण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
विद्यार्थ्यांनी अपयशामुळे खचून न जाता त्यातून शिकून पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करावेत. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये अमर्याद क्षमता असून योग्य मार्गदर्शन, जिद्द आणि नैतिक मूल्यांच्या बळावर कोणतीही उंची गाठता येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक व प्रेरणादायी उत्तरे देत शैक्षणिक प्रगती बरोबरच चारित्र्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. राकेश तावदारे होते. यावेळी सनातन संस्थेचे श्री सुनील वाडकर, व्ही. डी. इंदलकर, टी. ए. घोसरवाडे, संदीप खोत तसेच यू. पी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना चांगले संस्कार, शिस्त आणि समाजोपयोगी जीवन जगण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सुरेख व प्रभावी सूत्रसंचालन पी. बी. कळंत्रे यांनी केले.