निपाणी नगरी वृत्तसेवा (25)
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त निपाणी मराठा मंडळ संचलित बालवाडी, मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा आणि निपाणी मराठा मंडळ हायस्कूल, निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने आज अत्यंत भक्तिमय, शिस्तबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. “ज्ञान, संस्कार आणि संस्कृती” यांचा सुंदर मिलाफ घडवून आणणाऱ्या या दिंडीने संपूर्ण निपाणी शहर विठ्ठल नामाच्या गजराने आणि भक्ति रसाने भारावून टाकले.
दिंडीचे प्रमुख आकर्षण असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी पालखीचे पूजन शिक्षण समितीचे चेअरमन श्री. राजेश रघुनाथराव कदम तसेच संचालिका सौ. ज्योती राजेश कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. पालखी पूजना नंतर उपस्थितांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आरती केली. “ज्ञानोबा-तुकाराम”, “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल”, “जय जय राम कृष्ण हरी” अशा अखंड नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
त्यानंतर ढोल-ताशांचा दणदणाट, मृदुंगाचा मंजुळ नाद, टाळ-मंजीऱ्यांचा गजर आणि लेझीमच्या आकर्षक तालावर दिंडी मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाली. मराठा मंडळ, मंगळवार पेठ येथून प्रारंभ झालेली ही दिंडी मराठा मंडळ – मंगळवार पेठ – नगरपालिका – छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुरुवार पेठ, चन्नम्मा सर्कल मार्गे साखरवाडी रस्त्याने पुन्हा मराठा मंडळ परिसरात दाखल झाली. रस्ता, बाजारपेठ मार्गावर नागरिकांनी दिंडीचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. अनेकांनी पालखीचे दर्शन घेत विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत दिंडीवर पुष्पवृष्टी केली.
या दिंडीमध्ये बालवाडीतील चिमुकल्यांपासून ते माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, मावळे तसेच विविध पारंपरिक वेशभूषांमधून महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा जिवंत देखावा साकारला. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये, “शिवरायां मध्येच विठ्ठलाचे रूप” या भावनेचा संदेश विद्यार्थ्यांच्या साठी अनमोल प्रभावी भेट ठरली.
दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगाच्या साथीने अभंग, भारुडे आणि हरिनामाचा गजर करत संपूर्ण वातावरण भक्तिमय केले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी एकमेकांना गळाभेट देत वारकरी संप्रदायातील समता, बंधुभाव, प्रेम आणि ऐक्याचा संदेश दिला. छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच चन्नम्मा सर्कल येथे विद्यार्थ्यांनी सादर केलेली वारकरी परंपरेतील फुगडी, लेझीम आणि भक्तिमय नृत्याविष्कार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली. या मनमोहक सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली. या दिंडीचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, संतपरंपरा, वारकरी संप्रदायाचे विचार, सामाजिक समता, राष्ट्रप्रेम आणि नैतिक मूल्ये रुजविणे हा होता. आधुनिक शिक्षणाबरोबरच संस्कारांचे शिक्षण देण्याची परंपरा जपणाऱ्या निपाणी मराठा मंडळाच्या या उपक्रमाचे पालक आणि नागरिकांनी विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमाचे नियोजन, मार्गदर्शन आणि यशस्वी आयोजन हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. डी. डी. हळवणकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. बी. आर. मोहिते, प्राथमिक विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अमोल पाटील यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका व्ही. व्ही. पत्की, एस. डी. साखळकर, जे. आर. खपले, ए. एम. यादव, के. एल. कांबळे, के. एस. देसाई, अर्चना पाटील, पूजा पाटील, प्रियांका पाटील, तावदारे मॅडम, धनश्री पाटील, रेणुका फराकटे, लेखनिक मुकुंद कोरे तसेच प्राथमिक विभागाचे एस. एस. पाटील, जी. एस. पाटील, पी. एस. घाटगे, एस. बी. कांबळे, व्ही. एस. बुरुड, जे. पी. ढंगे, एस. एस. मोरे, एम. ए. चव्हाण, अश्लेषा केसरकर, विद्यार्थी प्रतिनिधी साईप्रसाद धडके, विद्यार्थिनी प्रतिनिधी श्वेता देशमुख विद्यार्थी-शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि शेकडो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.