निपाणी नगरी वृत्तसेवा (26)
मराठा मंडळ बेळगाव संचलित ‘मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल’मध्ये आज आषाढी एकादशीचा सण अत्यंत भक्तीमय वातावरणात व अध्यात्मिक उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृती, परंपरा आणि श्रद्धेचा हा अलौकिक उत्सव विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजवण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून साकारण्यात आला.
शाळेत के.जी. ते इयत्ता दुसरीसाठी ‘अभंग व फॅन्सी ड्रेस स्पर्धा’, तिसरी ते पाचवीसाठी ‘उपवास पदार्थ स्पर्धा’, सहावी ते आठवीसाठी ‘संत कथा कथन स्पर्धा’, तर नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आषाढी एकादशीचे महत्त्व’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळा, शिक्षक आणि पालकांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भव्य दिंडी सोहळा’. विठ्ठल-रुक्मिणी, वारकरी व विविध संतांच्या मनमोहक वेशभूषेत सजलेल्या बालवारकऱ्यांनी अवघी निपाणी नगरी दुमदुमून सोडली. या दिंडी सोहळ्याचे पूजन व उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहा घाटगे यांच्या हस्ते पार पडले. “परंपरा, भक्ती, श्रद्धा आणि आरोग्य यांचा सुरेख संगम म्हणजे आषाढी एकादशी होय,” असे उद्गार त्यांनी काढले.
निपाणी शहरातील नागरिकांनी या दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले अभंग, भजन, कीर्तन व नृत्याने वातावरणात अध्यात्मिक चैतन्य निर्माण केले. या सोहळ्यात पालकांचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता. संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला.