निपाणी नगरी वृत्तसेवा (26)
सुप्रसिद्ध लिटल एंजल इंग्लिश मीडियम स्कूल, निपाणी येथे आषाढी एकादशी निमित्त पारंपरिक दिंडी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत, टाळ-मृदंग, झांज, लेझीम आणि ढोलाच्या गजरात विठ्ठल नामस्मरण करत दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शशीभाई शहा चेअरमन प्रसन्नकुमार गुजर व्हॉइस चेअरमन सचिन आनंदा खोत संस्थेचे सीईओ डॉ. प्रकाश कदम, प्राचार्या सौ. फकरुनीसा मुल्ला तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शाळेचे शिक्षक महेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी झांज, लेझीम व ढोलाचे आकर्षक सादरीकरण केले. दिंडी प्रदक्षिणा कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल,गांधी चौक, मार्गे विठ्ठल मंदिरापर्यंत पोहोचली. विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विठ्ठल मंदिरात विद्यार्थ्यांनी झांजचे विशेष प्रात्यक्षिक सादर केले. या भक्तिमय वातावरणात अनेक भाविकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.
विठ्ठल मंदिर देवस्थान समितीच्या सदस्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना केळी व साबुदाणा खिचडीचा प्रसाद देऊन स्वागत केले. विठ्ठलाचे दर्शन घेऊन दिंडी सोहळ्याची उत्साहपूर्ण सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विठ्ठल मंदिर देवस्थान समितीचे संस्थेचे चेअरमन प्रसन्नकुमार गुजर यांनी शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि व्यवस्थापनाच्या वतीने आभार मानले.