निपाणी नगरी वृत्तसेवा (25) शिरगुपी (प्रतिनिधी)
निपाणी हेस्कॉम (HESCOM) प्रशासनाच्या ढिसाळ, बेजबाबदार आणि निष्काळजी कारभारामुळे शिरगुपी गावातील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा आणि नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. स्टँड क्रमांक २ आणि कन्नड प्राथमिक शाळेच्या अगदी वाटेवरच अत्यंत धोकादायक स्थितीत उघड्यावर असलेला वीज ट्रान्सफॉर्मर (टीसी) एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत उभा आहे. रस्त्याच्या उंचीवरून पाहिले असता, या टीसीचे तीन फेज आणि फ्युज इतक्या कमी उंचीवर आहेत की एखादा लहान मुलगा सहज हात लावून दुर्घटना ओढवून घेऊ शकतो. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना कोणतीही जीवितहानी झाल्यावरच जाग येणार का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
शाळकरी मुले व जनावरांच्या जीवाला थेट धोका!
संबंधित जागे जवळच बसस्टँड आणि प्राथमिक शाळा असल्याने येथे सतत लहान मुलांची आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. बसची वाट पाहताना शाळकरी मुले आणि महिला शिक्षिक याच परिसरात थांबतात. टीसीचे फ्युज जमिनीपासून अवघ्या तीन फुटाच्या अंतरावर म्हणजेच लहान मुलांच्या थेट डोक्याच्या आणि अंगाच्या उंचीवर आले आहेत. एखादे मुके जनावर जरी बाजूने गेले तरी त्याला या फ्युजचा शॉक लागून मृत्यू होण्याचा प्रचंड धोका निर्माण झाला आहे. एवढे स्पष्ट दिसत असतानाही अधिकाऱ्यांनी याकडे पूर्णपणे डोळेझाक केली आहे.
तिन महिन्यांपूर्वीची घटना विसरलात का?
मागील अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच शिरगुपी गावातील एका दलित समाजातील होतकरू निष्पाप मुलाला गरज नसताना विद्युत खांबावर चढवून हेस्कॉम कार्यालयाने आपल्या कारभाराची अब्रू वेशीवर टांगली होती. त्या घटनेतून कोणताही धडा न घेता प्रशासनाचा हा प्राणघातक निष्काळजीपणा अजूनही सुरूच आहे.
तातडीने सुधारणा करा, अन्यथा गंभीर परिणाम!
सार्वजनिक सुरक्षेचा विचार करून संबंधित ट्रान्सफॉर्मरभोवती तातडीने पूर्ण उंचीचे मजबूत मेटल कंपाऊंड उभारण्यात यावे, धोकादायक फ्युज वरच्या भागाला बसवण्यात यावेत आणि स्पष्ट इशारा फलक लावावेत. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हेस्कॉमने तात्काळ हालचाल करावी. भविष्यात या उघड्या ट्रान्सफॉर्मरमुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण आणि थेट जबाबदारी हेस्कॉमच्या संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवरच राहील, असा इशारा ग्रामस्थ आणि पालकांनी दिला आहे.