निपाणी नगरी वृत्तसेवा (9)
येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात रविवारी (ता. ९) महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्था निपाणी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना संस्थेचे अध्यक्ष किशोर बाळी यांनी महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेला यावर्षी १०.७२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची घोषणा केली.
कार्यक्रमाचा प्रारंभ प्राणलिंग स्वामीजी व उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व रोपाला पाणी घालून झाला. उज्वल गच्ची व सहकाऱ्यांनी भक्तीगीतांचा कार्यक्रम सादर केला, तर सुजाता जाधव यांनी बसववचन सादर केले. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) एस. के. आदन्नावर यांनी मागील सभेच्या वृत्तांताचे वाचन केले, तर संचालक सुरेश शेट्टी यांनी लेखापरीक्षण अहवाल सादर केला.
सभेत उपस्थितांना संबोधित करताना अध्यक्ष किशोर बाळी म्हणाले, “जागृत सभासद, प्रामाणिक संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांमुळेच संस्थेची निरंतर प्रगती होत आहे. संस्थेचे व्यवहार वेगाने वाढत असून, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन तांत्रिक ज्ञान रुजविले जात आहे. संस्थेला मल्टीस्टेट संस्थेत रूपांतरित करण्यासाठी आमचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. भविष्यात सभासदांना डिजिटल बँकिंगच्या आधुनिक सुविधा पुरवून संस्था अधिक सक्षम करण्याचा आमचा मानस आहे.”
संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा देताना त्यांनी सांगितले की, सध्या संस्थेचे २२ हजार ५९ सभासद, २०.३० कोटी रुपयांचे भागभांडवल, ८६.५६ कोटींचा राखीव निधी, ६७५ कोटी रुपयांच्या ठेवी, ४९४.५८ कोटी रुपयांचे कर्जवाटप, तर ६४.५१ कोटी रुपयांची सुरक्षित गुंतवणूक आहे. संस्थेची एकूण वार्षिक उलाढाल ४६८६.३३ कोटी असून, ८०७.६० कोटी रुपयांचे खेळते भांडवल आहे. संस्थेतर्फे इतर ठिकाणी ६४.५१ लाखावर सुरक्षित गुंतवणूक करण्यात आली असून सभासदांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
याप्रसंगी प्रसिद्ध व्याख्याते विठ्ठल कोतेकर यांचे ‘तणावमुक्त जीवनाच्या यशा मागील रहस्य’ या विषयावर व्याख्यान पार पडले. सभेला व्यासपीठावर प्राणलिंग स्वामी, संस्थापक अध्यक्ष डॉ. सी. बी. कुरबेट्टी, श्रीकांत परमणे, प्रताप पट्टणशेट्टी उपस्थित होते. तसेच संचालक महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, सदानंद दुमाले, सदाशिव धनगर, दिनेश पाटील, डॉ. एस. आर. पाटील, संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया पाटील, सुवर्णा पट्टणशेट्टी, हाल शुगरच्या उपाध्यक्षा गीता पाटील यांच्यासह इतर संचालक, सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.