निपाणी नगरी वृत्तसेवा दि. २६ ऑक्टोबर २०२६
निपाणी मराठा मंडळ हायस्कूल, निपाणी येथे सोमवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनकार्याची, विचारांची आणि भारतीय साहित्याला त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रा. ॲड. डी. डी. हळवणकर यांनी आपल्या मनोगतात महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. महर्षी वाल्मिकी यांना आदिकवी म्हणून ओळखले जाते. त्यांनी रचलेले रामायण हे भारतीय संस्कृती, साहित्य, परंपरा आणि जीवनमूल्यांचा अमूल्य ठेवा आहे. रामायणातून सत्य, कर्तव्यनिष्ठा, त्याग, संयम, बंधुभाव, न्याय आणि आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.
महर्षी वाल्मिकी यांचे जीवन हे परिवर्तन, ज्ञान आणि आत्मचिंतनाचे प्रेरणादायी उदाहरण आहे. माणसाच्या जीवनात परिस्थितीपेक्षा विचारांना, कृतीला आणि योग्य मार्गाची निवड करण्याला अधिक महत्त्व असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन चांगले विचार आत्मसात करावेत, नियमित अभ्यास करावा आणि आपल्या आचरणातून आदर्श व्यक्तिमत्त्व घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी व्ही. व्ही. पत्की आणि एस. डी. साखळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनकार्याचे आणि रामायणातील आदर्श विचारांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी थोर साहित्यिकांच्या विचारांचा अभ्यास करून सत्य, प्रामाणिकपणा, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि मानवता ही जीवनमूल्ये आत्मसात करावीत, असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला ए. एम. यादव, के. एल. कांबळे, के. एस. देसाई, अर्चना पाटील, पूजा पाटील, प्रियांका पाटील, धनश्री पाटील आणि चौगुले मॅडम, तसेच लेखनिक श्री. मुकुंद कोरे आणि सौ. रेणुका फराकटे उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थीही उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री. जे. आर. खपले यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.