निपाणी नगरी वृत्तसेवा (18)
देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर येथील इंग्रजी विभागामार्फत संशोधन पद्धती या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले होते.
शिवाजी विद्यापीठाच्या एम.ए. इंग्रजी अभ्यासक्रमामध्ये संशोधन पद्धती आणि संशोधन प्रकल्प लेखन यांचा समावेश केलेला आहे. त्या अनुषंगाने इंग्रजी विभागाद्वारे विद्यार्थ्यांसाठी सदर कार्यशाळेचे आयोजन केले. यामध्ये डॉ. दिगंबर कुलकर्णी, अण्णासाहेब डांगे महाविद्यालय, हातकणंगले आणि प्रा. डॉ. बळीराम सावंत, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, इस्लामपूर हे प्रमुख व्याख्याते लाभले. डॉ. कुलकर्णी यांनी इंग्रजी भाषाशास्त्र संशोधन पद्धती यावर सखोल विवेचन केले. तसेच डॉ. सावंत यांनी इंग्रजी साहित्य संशोधन पद्धती यावर विचार मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कॉलेजचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. रमेश साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना संशोधन पद्धतीवर मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेसाठी सहा विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन इंग्रजी विभागाच्या विभागप्रमुख डॉ. आनंदी कांबळे, समन्वयक प्रा. बी. जी. पाटील, प्रा. ज्योती बुवा, प्रा. स्मिता पाटील, डॉ. दिपा मडीवाळ, प्रा. विनायक वरुटे व प्रा. वनिता कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. आनंदी कांबळे यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. बी. जी. पाटील यांनी केली. कार्यक्रमाचे आभार प्रा. ज्योती बुवा आणि सूत्रसंचालन प्रा. विनायक वरुटे यांनी केले.
कार्यक्रमासाठी कॉलेजचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. रमेश साळुंखे तसेच जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह आणि संस्थेच्या उपाध्यक्षा मा. डॉ. तृप्तीभाभी शहा यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.