निपाणी नगरी वृत्तसेवा (13)
निपाणीमध्ये प्रथमच डे–नाईट वार्डनिहित क्रिकेट स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद
रोहन साळवे फाउंडेशनच्या वतीने आयोजित मालक चषक 2026 ही निपाणी शहरातील पहिलीच डे–नाईट (दिवस–रात्र) वार्डनिहाय क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेत निपाणी शहरातील ३१ वार्डांतील संघांनी आपला सहभाग नोंदवला होता.
सदर स्पर्धेला ७ जानेवारी २०२६ रोजी प्रारंभ झाला असून ११ जानेवारी २०२६ रोजी अंतिम सामन्याने स्पर्धेची सांगता झाली. अंतिम पाचव्या दिवशी प्रेक्षकांच्या उपस्थितीत चौथ्या फेरीचे (Quarter Final – उपांत्यपूर्व फेरी) चार सामने, उपांत्य फेरीचे (Semi Final) दोन सामने आणि अंतिम सामना (Final – अंतिम फेरी) खेळवण्यात आले.
विशेष बाब म्हणजे अंतिम सामन्याच्या दिवशी तब्बल १०,००० हून अधिक निपाणीकर नागरिकांनी मैदानावर उपस्थित राहून या स्पर्धेचा मनसोक्त आनंद घेतला, त्यामुळे संपूर्ण परिसर क्रीडामय वातावरणाने भारावून गेला होता. उपांत्यपूर्व फेरी (Quarter Final) व उपांत्य फेरीतील (Semi Final) चुरशीच्या लढती झाल्या.
उपांत्य फेरीतील (Semi Final) पहिल्या सामन्यात वार्ड क्रमांक १९ व वार्ड क्रमांक ३० यांच्यात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. शेवटच्या षटकात १८ धावांची गरज असताना, फलंदाज राजू तेवर यांनी विलक्षण संयम, आत्मविश्वास आणि चिकाटी दाखवत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह वार्ड क्रमांक ३० संघाने अंतिम फेरीत (Final) धडक मारली.
दुसऱ्या उपांत्य फेरीत (Semi Final) वार्ड क्रमांक २३ व वार्ड क्रमांक २९ हे संघ आमनेसामने आले. उत्कृष्ट फलंदाजी तसेच अचूक आणि प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर वार्ड क्रमांक २९ संघाने हा सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामना (Final) वार्ड क्रमांक २९ व वार्ड क्रमांक ३० यांच्यात खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करत वार्ड क्रमांक २९ संघाने निर्धारित सहा षटकांत ७७ धावा जमवल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना वार्ड क्रमांक ३० संघाला केवळ ५७ धावांपर्यंत मजल मारता आली. परिणामी वार्ड क्रमांक २९ संघाने निपाणीतील पहिल्या डे–नाईट वार्डनिहाय मालक चषक 2026 विजेतेपदावर आपले नाव कोरले.
स्पर्धेचे प्रमुख आयोजक सर्वेसर्वा रोहन साळवे मालक यांनी यावेळी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, “निपाणीतील खेळाडूंना अधिकाधिक संधी मिळाव्यात, स्थानिक क्रीडापट्टूंचा आत्मविश्वास वाढावा आणि टेनिस बॉल क्रिकेट आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले जात असल्याने निपाणीचे नाव देशपातळीवर उजळावे, या उद्देशानेच या डे–नाईट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.” तसेच इथून पुढे सुद्धा निपाणी मध्ये मोठ्या प्रमाणात चांगल्या स्पर्धा भरवून अनेक खेळाडूंना देश पातळीपर्यंत पोहोचवणे हे आपले प्रामाणिक ध्येय आहे असे सांगितले.
वैयक्तिक पुरस्कार वितरण
सामनावीर (Man of the Match) : बंटी कांबळे – ३७ धावा व २ बळी
उत्कृष्ट गोलंदाज (Best Bowler) : सोनू उर्फ अनिकेत लोहार
(कर्णधार – वार्ड क्रमांक २९)
उत्कृष्ट फलंदाज (Best Batsman) :
सद्दाम बडेघर (कर्णधार – वार्ड क्रमांक २३ | संपूर्ण स्पर्धेत १४० धावा)
मालिकावीर (Man of the Tournament) :
अभिजीत सांडूगडे (कर्णधार – वार्ड क्रमांक ३० | ९ बळी व ११५ धावा)
उदयोन्मुख खेळाडू (Emerging Player) : शुभम अस्वले (वार्ड क्रमांक ३)