निपाणी नगरी वृत्तसेवा..(नांगणुर प्रतिनिधी-22)
तीन–चार बँक खाती, फक्त एक खात्यात ३५ लाख शिल्लक असताना विकास कुठे?
हुक्केरी तालुक्यातील मत्तीवडे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नांगनूर (KS),भैरापूर या तीन गावांमध्ये विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला असून, हे प्रकरण आता उघड संघर्षाच्या टप्प्यावर पोहोचले आहे.
दिनांक १६ जानेवारी रोजी नांगनूर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात थेट जाब विचारत माध्यमांसमोर आरोप मांडले होते. त्यावेळी “२२ जानेवारी रोजी सर्व माहिती देऊन शंका दूर करू” असे आश्वासन ग्रामपंचायत अध्यक्षांनी दिले होते. त्यानुसार नांगणुर (केस) मंगाई देवी जवळील कुलकर्णी गल्ली येथे वार्ड सभा घेण्यात आली. मात्र या सभेत शंका दूर होण्याऐवजी संशय अधिक गडद झाला, असा ठाम निष्कर्ष ग्रामस्थांनी काढला.
१८ कामांवर नागरिकांचे बोट, उत्तरे मात्र अपुरी..
नांगनूर ग्रामस्थांनी थेट आरोप करत सांगितले की, ग्रुप ग्रामपंचायतीतील किमान १८ विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे. कामे प्रत्यक्षात न करता ➡️ केवळ फोटो अपलोड ➡️ निधी वेगळ्याच कामांकडे वळवला ➡️ कागदोपत्री काम पूर्ण दाखवले. असा गंभीर प्रकार घडल्याचा आरोप नागरिकांनी केला.
३५ लाख एका खात्यात, उर्वरित खात्यांचे काय?
ग्रामस्थांनी उपस्थित केलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे—ग्रामपंचायतच्या बँक ऑफ इंडिया खात्यात सुमारे ३५ लाख रुपये शिल्लक असताना गावाच्या विकासासाठी तो निधी का वापरला गेला नाही?
याशिवाय मतीवडे ग्रुप ग्रामपंचायतीची तीन ते चार वेगवेगळी बँक खाती आहेत. त्या खात्यांतील निधी, खर्च व हस्तांतरणाची माहिती कुठे आहे?हा पैसा नेमका कुठल्या कामासाठी आणि कोणाच्या आदेशाने वर्ग करण्यात आला? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे सभेत मिळाली नाहीत.
बोरवेल, गावचा रस्ता, स्ट्रीट लाईट, अंगणवाडी काम ग्रामसभा – सर्वच संशयाच्या भोवऱ्यात
ग्रामस्थांनी पुढील गंभीर बाबी मांडल्या— बोरवेल एक ठिकाणी बिल दोन वेळेला, अंगणवाडी इमारतीतील फरशी कामात गैरप्रकार ,काम केलेल्या कामगारांचे पैसे देखील दिले नाहीत. बोरवेल कनेक्शनमध्ये अनियमितता दीर्घकाळ ग्रामसभा न घेता लोकशाही प्रक्रियेचा गळा दाबणे. ग्रामसभा न घेणे हे केवळ दुर्लक्ष नसून भ्रष्टाचार लपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
“आरोप बिनबुडाचे” म्हणत अध्यक्षांनी जबाबदारी झटकली
ग्रामपंचायत अध्यक्ष दशरथ कुलकर्णी यांनी सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा करत “सर्व कामे पूर्ण असून दप्तरात नोंद आहे” असे सांगितले. मात्र नागरिकांच्या थेट प्रश्नांना समाधानकारक व कागदोपत्री उत्तरे न दिल्यामुळे अध्यक्षांची भूमिका संशयास्पद ठरत असल्याची भावना सभेत स्पष्टपणे उमटली. सभा तणावपूर्ण वातावरणात पार पडली. अध्यक्ष व सदस्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आरोप–प्रत्यारोप झाले. ही केवळ सभा न राहता भ्रष्टाचारा विरोधातील नागरिकांचा उद्रेक ठरली.
लोकायुक्त ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लढा
ग्रुप ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाला आहे की नाही, याची निष्पक्ष शहानिशा व्हावी यासाठी—➡️ कर्नाटक लोकायुक्त➡️ तालुका पंचायत➡️ जिल्हा पंचायत➡️ जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे तात्काळ लेखी तक्रारी दाखल केल्या जाणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी माध्यमांना दिली. दोषी कोणही असो, कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका नागरिकांनी मांडली.भ्रष्टाचारा विरोधातील लढ्यात नागरिकांचा निर्णायक सहभाग
मतीवडे ग्रुप ग्रामपंचायतीतील हा संघर्ष स्पष्टपणे दाखवतो की,👉 विकासाच्या नावाखाली लुट सहन केली जाणार नाही👉 नागरिक जागे झाले आहेत👉 भ्रष्टाचारा विरोधातील लढ्यात जनता स्वतः पुढे आली आहे. भ्रष्टाचाराचा बिमोड होणे ही केवळ मागणी नसून लोकशाहीची गरज आहे, असा स्पष्ट संदेश या आंदोलनातून दिला जात आहे.