निपाणी नगरी वृत्तसेवा..( 22) गुरुवार
“मागील चारच दिवसांपूर्वी ठरलेली ग्रामसभा आजही रद्द
सर्व कामांना केवळ बिले, प्रत्यक्ष कामांचा मागमूस नाही”
शिरगुपी (ता. निपाणी) येथील ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थ व तरुणाईकडून करण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी नियोजित असलेली ग्रामसभा आजपर्यंत मुद्दाम न घेता ग्रामस्थांच्या प्रश्नांना बगल देण्यात आली. अखेर संतप्त ग्रामस्थांनी आणि तरुणांनी थेट तालुका पंचायत कार्यालय गाठून प्रशासनास दिले निवेदन
ग्रामपंचायत हद्दीतील रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, स्वच्छता, घरकुल, स्ट्रीट लाईट, दलित व अल्पसंख्याक विकास, महिला व बालकल्याण अशा अनेक कर्नाटक शासनाच्या महत्त्वाच्या योजनांमध्ये प्रत्यक्ष काम न करता फक्त कागदोपत्री बिले जोडण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे.
काम शून्य, बिले मात्र पूर्ण – भ्रष्टाचाराचा ठोस संशय
ग्रामस्थांनी मांडलेल्या माहितीनुसार अनेक विकासकामे प्रत्यक्षात झालेली नसताना लाखो रुपयांची बिले काढण्यात आली आहेत. काही ठिकाणी काम अर्धवट तर काही ठिकाणी कामच झाले नसल्याचे फोटो, व्हिडिओ व प्रत्यक्ष पाहणी वरून दिसून येत आहे. हे सर्व प्रकार ग्रामसभेत उघड होऊ नयेत म्हणूनच ग्रामसभा टाळण्यात येत असल्याचा आरोप जोर धरत आहे.
ग्रामसभेचे महत्त्व दुर्लक्षित – लोकशाहीचा गळा दाबला
ग्रामसभा ही गावाच्या विकासाची सर्वोच्च व पारदर्शक यंत्रणा आहे.
✔ ग्रामपंचायतीचा हिशोब
✔ विकासकामांची माहिती
✔ योजनांचा लाभ
✔ नागरिकांचे प्रश्न व ठराव
हे सर्व ग्रामसभेत मांडणे कायद्याने बंधनकारक असतानाही शिरगुपी ग्रामपंचायतीने ग्रामसभा न घेता लोकशाही प्रक्रियेची खुलेआम पायमल्ली केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
तरुणाई एकत्र आली म्हणून पोलिसांचा बडगा?..
अनेक तरुणांनी युवापुढीची मोठ बांधत सर्वना एकत्र आणत अनेक आर्थिक व्यवहारातील घोटाळे बाहेर काढण्याच्या प्रकरणात पुढाकार घेतला.पण या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे ग्रामस्थ व तरुणाई एकत्र येऊन प्रश्न विचारू लागल्यावर सभा उधळण्याचा प्रयत्न करत पोलिसांचा बडगा दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. पण प्रशासनाने देखील गावकऱ्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असल्याचे सांगितल्यामुळे गावातून पोलीस प्रशासनाचे देखील कौतुक होत आहे. शांततेने, लोकशाही मार्गाने प्रश्न विचारणाऱ्या तरुणांवर दडपशाही करण्याचा हा प्रयत्न असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांतून उमटत आहे. म्हणून काल सर्व शिरगुपी ग्रामस्थांनी व तरुणांनी वरील आशयाचे निवेदन तालुका पंचायत व तहसीलदार कार्यालयात देऊन आपली व्यथा मांडली असून लवकरच त्यांच्या अर्जाचा विचार करून ग्रामसभा बोलावण्याची ग्वाही देण्यात आल्याचे समजते.