निपाणी नगरी वृत्तसेवा अर्जुननगर (25)
जागतिक स्तरावर यशस्वी खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवायचा असेल तर खेळाडूंची खरी स्पर्धा ही स्वतःशीच असते. जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण सराव आणि संयम यांच्या जोरावरच खेळाडू प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वतःला घडवत असतो, असे प्रतिपादन जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. आशिषभाई शाह यांनी केले.
देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर येथे आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. विजेत्या खेळाडूंनी स्वतःशी आणि खेळाशी प्रामाणिक राहणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यातूनच यश आणि नावलौकिक प्राप्त होतो, असेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह उपस्थित होत्या.
मान्यवरांच्या हस्ते प्राविण्यप्राप्त खेळाडूंना ट्रॅकसूट, ट्रॉफी, प्रमाणपत्रे व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. जी. डी. इंगळे यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा विभागाची वाटचाल तसेच विविध स्पर्धा व परीक्षांमधील यशाचा चढता आलेख मांडला.
या प्रसंगी कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या सौ. एस. पी. जाधव, पर्यवेक्षक मेजर डॉ. अशोक डोनर, IQAC समन्वयक प्रा. डॉ. पी. डी. शिरगावे, जिमखाना विभागप्रमुख रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. रमेश साळुंखे, संमेलन विभागप्रमुख डॉ. विजय गायकवाड, प्रा. विकास माने, प्रा. निरंजन जाधव तसेच प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सैन्य दलात अग्निवीर म्हणून निवड झाल्याबद्दल कु. महेश चौगुले व धैर्यशील खोत यांचा, तसेच बीएसएफमध्ये निवड झाल्याबद्दल कुमारी शुभांगी सावंत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील भूमिका मोहिते, अंकिता खुरपे, आदित्य दिवटे, रितेश म्हैसाळे, मारिया सुतार, श्रद्धा पाटील, शुभांगी खामकर, शिरीष माने, अनिकेत सूर्यवंशी, ऋषिकेश चव्हाण व प्रणव पवार यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधील नैपुण्याबद्दल गौरविण्यात आले. हॉलीबॉल (मुले-मुली) व बेसबॉल संघांनी झोनल व इंटरझोनल स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांनाही पारितोषिके प्रदान करण्यात आली.
एम. एस. सी. अॅग्रो केमिकल अॅण्ड पेस्ट मॅनेजमेंट या विषयात विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल कुमारी नमिरा देसाई तसेच चतुर्थ क्रमांक मिळवल्याबद्दल कुमारी स्वप्नाली खवरे यांचा विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुजाता पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. किशोर गुरव यांनी मानले. हा समारंभ यशस्वी होण्यासाठी जिमखाना कर्मचारी वैभव सोनार, शिवदास चव्हाण व संतोष वागळे यांनी मोलाचे सहकार्य केले.