निपाणी नगरी वृत्तसेवा..(27)
“ग्रामपंचायत ही गावाच्या विकासाची पहिली पायरी आहे. तीच जर वादाच्या भोवऱ्यात अडकली, तर विकासाचा रथ अर्ध्यावरच थांबतो. लोकशाही केवळ निवडणुकी पुरती मर्यादित नसून, ती उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेवरच उभी असते. “जिथे जबाबदारी नाही, तिथे विकास नाही” — या तत्वाची जाणीव प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी ठेवणे गरजेचे आहे. गावाचा विकास हा केवळ निधी खर्चाच्या आकड्यांत नव्हे, तर नागरिकांच्या समाधानात दिसला पाहिजे. शिरगुपीतील आंदोलन हे केवळ विरोध नव्हे, तर उत्तरदायित्वाची मागणी आहे — आणि हीच खरी लोकशाहीची ताकद आहे.”
शिरगुपी (ता. निपाणी) – गावाच्या विकासासाठी असलेली ग्रामपंचायतच जर नागरिकांच्या प्रश्नांकडे पाठ फिरवत असेल, तर “शेतच कुंपण खातं” अशी म्हण खरी ठरते, अशी संतप्त भावना शिरगुपी येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामपंचायतीच्या कथित मनमानी कारभारा विरोधात नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आज ठिय्या आंदोलन करत तीव्र नाराजी नोंदवली.
गावातील रस्ते, गटारी आणि पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्याचे दाखवले जात असले, तरी प्रत्यक्षात ठोस विकासकामे झालेली दिसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. “नाव मोठं लक्षण खोटं” अशी स्थिती ग्रामपंचायतीच्या कामकाजाची झाल्याची टीकाही करण्यात आली.
दरम्यान, ग्रामसभाच एकदाही न घेण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत प्रशासनाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लोकशाहीच्या पायाभूत तत्वांपैकी एक असलेली ग्रामसभा दुर्लक्षित राहिल्यास, निर्णय प्रक्रियेत नागरिकांचा सहभागच नष्ट होतो, अशी खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. पंचायत कर्मचाऱ्यांच्या गैर वर्तणुकी बाबत ग्रामस्थांनी असमाधान व्यक्त केले. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांशी उर्मटपणे वागणे, कामात टाळाटाळ करणे असे आरोप करण्यात आले. संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीचा ठराव मंजूर झाल्याचे सांगितले जात असले, तरी त्यावर कार्यवाही न झाल्यामुळे प्रशासनावरील विश्वास डळमळीत झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
रोजगार हमीचा पगार रखडला, नागरिकांवर उपासमारीची वेळ, मात्र प्रशासनातील कनिष्ठ कर्मचारी मालामाल…
पूर्वीच्या मनरेगा व आत्ता नव्याने नामकरण झालेल्या जी रामजी रोजगार हमी योजनेअंतर्गत काम केलेल्या महिलांचा पगार अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याची तक्रार आंदोलनावेळी पुढे आली. यामुळे कुटुंबांवर आर्थिक ताण वाढत असून, “काम करा आणि वेतनासाठी भटकंती करा” अशी वेळ महिलांवर आल्याची खंत व्यक्त करण्यात आली. मात्र या गलथान कारभारामुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ मात्र प्रशासनातील कनिष्ठ कर्मचारी मालामाल होत असल्याचे चित्र दिवसेंदिवस शिरगुपी मध्ये दिसत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.
दरम्यान, मागील आठ ते पंधरा दिवसापासून प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष निवेदन देऊन आज लाक्षणिक उपोषणास बसलेल्या उपोषण कर्त्यांची विचारपूस करण्यासाठी व योग्य न्याय देण्यासाठी निपाणीचे तहसीलदार सुरेश मुंजे, तालुका पंचायत अधिकारी प्रवीण कट्टी, शहर पोलीस प्रशासन यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांशी चर्चा केली. व येत्या १० मार्चपर्यंत विशेष बैठक बोलावून सर्व तक्रारींची सविस्तर चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याने आंदोलन कर्त्यांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित करत आज प्रशासनास दिलासा दिला.
या आंदोलनात मागील चार महिन्यापासून सक्रिय असलेले रणजीत कांबळे, अमर चव्हाण, रुपेश रानमाळे, संतोष कावळे, अल्ताफ मुल्ला, अक्षय रक्ताडे, याच्यासह शिरगुपी गावातील सर्व सुजाण नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.