निपाणी नगरी वृत्तसेवा..(28)
शनिवार 28 फेब्रुवारी रोजी अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल, कोडणी- निपाणी, येथे विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित शैक्षणिक प्रात्यक्षिके सादर केली. 28 फेब्रुवारी हा जागतिक विज्ञान दिन म्हणून भारतात सर्वत्र साजरा केला जातो. याचे औचित्य साधून येथील विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण क्रमातील सर्व विषयांवर आधारित विविध शैक्षणिक प्रात्यक्षिके आज पालकांसमोर सादर केली.
यामध्ये गणित, विज्ञान, इंग्रजी, कन्नड, हिंदी ,समाज विज्ञान अशा विविध विषयांचा समावेश करण्यात आला होता. वर्षभर विद्यार्थी विविध विषयांमधून अनेक नवनवीन मुद्दे शिकत असतात .जेव्हा विद्यार्थी क्रियाकलाप माध्यमातून या गोष्टी शिकतो तेव्हा त्या गोष्टी दीर्घकाळ त्यांच्या स्मरणात राहतात व शैक्षणिक अभ्यासक्रम अधिक सहज व सोपा होतो .अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दरवेळी क्रियाकलाप शिक्षणावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे आज जागतिक विज्ञान दिनाचे औचित्य साधून वर्षभर शिकलेल्या अभ्यासक्रमाची विविध प्रात्यक्षिके आज विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसमोर सादर केली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने झाली. शाळेचे संचालक डॉक्टर ज्योतिबा चौगुले, सेक्रेटरी डॉक्टर अमर चौगुले व शाळेच्या प्राचार्या सौ चेतना चौगुले यांनी प्रमुख पाहुणे म्हणून यावेळेस उपस्थिती दर्शविली. यावेळी पालकांशी संवाद साधताना डॉक्टर अमर चौगुले यांनी प्रत्येक मुलांमध्ये एक वैशिष्ट्य दडलेले असते, त्याला जोपासून योग्य तो वाव देणे हे गरजेचे असते याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना खास मार्गदर्शन केले .तसेच पालकांनी विद्यार्थ्यांसोबत अधिकाधिक वेळ गुंतवून त्यांना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन करण्यासही सुचविले.
या कार्यक्रमास पालकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. तसेच विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे व सादर केलेल्या प्रात्यक्षिकांचे विशेष कौतुकही करण्यात आले .यावेळी शाळेच्या प्राचार्या सौ चेतना चौगुले, सेक्रेटरी डॉक्टर अमर चौगुले, संचालक डॉक्टर ज्योतिबा चौगुले यांच्या समवेत शाळेचा संपूर्ण शिक्षक वर्ग पालक वर्ग व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ शिल्पा तारळे यांनी केले तर सौ सावित्री पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.