निपाणी नगरी वृत्तसेवा..(16)
अर्जुननगर: भूगोल व शास्त्र शाखेच्या पदवीधरांसाठी GIS व Geoinformatics च्या माध्यमातून नोकरी व्यवसायाच्या नव्या वाटा खुल्या असे प्रतिपादन डॉ. प्रशांत पाटील यांनी स्मार्ट करिअर्स इन जिओग्राफी अँड जिओइन्फॉर्मेटिक्स या कार्यशाळेत भूगोलाच्या व शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना केले.
देवचंद कॉलेज, अर्जुननगर येथील भूगोल व संगणक शास्त्र विभाग आणि भूगोल विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने स्मार्ट करिअर्स इन जिओग्राफी अँड जिओइन्फॉर्मेटिक्स या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा. डॉ. प्रशांत पाटील सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी भूगोल विषयाच्या पदवीधरांना नवीन कोर्सेस तसेच मल्टिनॅशनल कंपनीमध्ये GIS Expert, सर्वेक्षक, माहिती विश्लेषक तसेच संगणकशास्त्रासह शास्त्र शाखेच्या पदवीधरांना डेव्हलपर्स म्हणून काम करण्याच्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. यादरम्यान टॉमटॉम, जिनेसिस, रिलायन्स यासारख्या मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये सर्वेक्षक, विश्लेषक व नकाशाकार या पदासाठी संधी उपलब्ध असल्याचे सांगितले.
दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. अभिजीत पाटील सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी ड्रोन तंत्रज्ञानाचा मोजणी (सर्वेक्षण) तंत्रासाठी वापर या विषयावर सविस्तर मांडणी केली बदलत्या तंत्रज्ञानासोबत मोजणी क्षेत्रातील अचूकता टिपण्यासाठी ड्रोन चा प्रभावी वापर कसा केला जातो हे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दाखविले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. जी. डी. इंगळे यांनी विद्यार्थ्यांनी आधुनिक ज्ञान मिळवण्यासाठी व व्यवसायाच्या नवीन वाटा शोधण्यासाठी आंतरविद्याशाखीय संबंध लक्षात घेऊन विविध प्रकारचे तंत्रज्ञान अवगत करून स्वतःच्या पायावर उभा राहण्याचे नवीन मार्ग निर्माण करावेत असे आवाहन केले.
याप्रसंगी भूगोल तसेच संगणक शास्त्राच्या विद्यार्थ्यांना प्रा. डॉ. विजय गायकवाड यांनी कार्यशाळेच्या आयोजनाचे उद्दिष्ट प्रस्ताविकाच्या माध्यमातून स्पष्ट केले. तर प्रा. प्रशांत कुंभार यांनी आभार मानले.
सदर कार्यशाळेच्या नियोजनासाठी शिवाजी विद्यापीठ, भूगोल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. सचिन पन्हाळकर यांचे सहकार्य तसेच जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्रीमान आशिषभाई शाह व उपाध्यक्षा डॉ. तृप्तीभाभी शाह यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील भूगोल तसेच संगणक शास्त्र विभागाचे विद्यार्थी, संगणकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. स्वप्निल पोतदार, प्रा. ज्योती कर्णिक, प्रा. आरती माने यांच्यासह सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.