निपाणी नगरी वृत्तसेवा (14) अर्जुननगर:
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या लीड कॉलेज योजनेअंतर्गत “निसर्ग व नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन पर्यावरण जनजागृती समिती, IQAC व वनस्पतिशास्त्र विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने देवचंद कॉलेज अर्जुननगर येथे करण्यात आले.
कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो.डॉ. जी. डी इंगळे यांनी जनता शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय पद्मभूषण देवचंदजी शाह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले. त्यांनी उद्घाटन पर भाषण मध्ये निसर्ग संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट करत आजच्या काळात वाढते प्रदूषण, नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास आणि जैव विविधते वरील संकट याकडे लक्ष वेधले. या कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक वक्ते डॉ. श्रुती कुलकर्णी आणि प्रा. अर्चना पाटील यांनी निसर्ग व नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, शाश्वत विकास, पाणी-माती-वनसंवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व तसेच पर्यावरणपूरक जीवनशैली याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे अध्यक्षस्थान IQAC समन्वयक प्रा. डॉ. पी .डी शिरगावे यांनी भूषवले. अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरणाबद्दल जागरूक राहून नैसर्गिक संसाधनांसाठी वैयक्तिक व सामूहिक जबाबदारी उचलावी असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत प्रो. डॉ. वर्षा खुडे यांनी पर्यावरण जनजागृती समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, पाणी व ऊर्जा बचत, प्लास्टिक मुक्त परिसर आणि जैवविविधता संरक्षण यांसारख्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यशाळेस अग्रणी महाविद्यालय समन्वयक आरती नाडगौडा ,उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांनी या विषयावर उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदविला. शेवटी सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यशाळेसाठी सदाशिवराव मंडलिक कॉलेज मुरगुड, दूध साखर महाविद्यालय बिद्री, कर्मवीर हिरे कॉलेज गारगोटी, डी आर माने कॉलेज कागल, येथील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरली, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या कार्यशाळेला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्रीमान आशिषभाई शाह , उपाध्यक्षा डॉ . सौ. तृप्तीभाभी शाह, संस्थेचे खजिनदार श्री सुबोधभाई शहा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ किरण अबिटकर, प्राध्यापक अमृता गोंधळी , प्राध्यापक सोनाली कुंभार ,दयानंद अनुसे, राजश्री वायदंडे, पांडुरंग पवार, विकास कोरे, रणजीत कोळी यांचे सहकार्य लाभले. कार्यशाळेचे आभार प्रा. अजित गुरव यांनी मांडले तर सूत्रसंचालन डॉ. दीपा मडिवाल यांनी केले.