निपाणी नगरी वृत्तसेवा..(14) अर्जुननगर
निपाणी–कोल्हापूर परिसरातील ख्यातनाम समाजसेवक, दूरदृष्टी असलेले उद्योगपती व शिक्षणप्रेमी पद्मभूषण देवचंदजी शाह यांच्या पवित्र स्मृतीस देवचंद महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. जी. डी. इंगळे यांनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था व शिक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी देवचंदजी शाह यांनी आयुष्यभर उल्लेखनीय कार्य केले. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी निपाणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले .त्यावेळी हा संपूर्ण परिसर अशिक्षित अज्ञानी होता .हे सर्व सामाजिक प्रश्न जाणून घेऊन प्रथमता नगरपालिकेची इमारत सुसज्ज केली. आयुर्वेदिक दवाखाना, ग्रंथालय, मोफत वाचनालय,शिशु संगोपन केंद्र, राणी लक्ष्मीबाई सुतिका गृह अशा विविध प्रकारच्या सामाजिक संस्था त्यांनी निर्माण केल्या.
कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर मराठी भाषिकांचा प्रश्न सोडवण्यासाठी व गोरगरिबांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे या हेतूने जनता शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना करून त्यांनी ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या घरापर्यंत ज्ञानगंगा पोहोचवण्याचे व गरिबांच्या स्वप्नांना बळ देण्याचे महान कार्य केले. शिक्षण क्षेत्राबरोबरच आर्थिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले. निपाणी शहरातील पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय व्हावी व कोरडवाहू शेतीला पाणी मिळावे , परिसरातील खेडी स्वयंपूर्ण व्हावीत म्हणून जवाहर तलावाची निर्मिती करून पाण्याचा कायमचा प्रश्न मिटवला. पद्मभूषण देवचंद ची शाह यांना कर्मवीर भाऊराव पाटील, विनोबा भावे, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक अशा दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभला व त्यांच्या विचारांचा वारसा देवचंदजी शाह यांनी आयुष्यभर जोपासला. त्यांच्या कार्याचा आदर्श आजही विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांना प्रेरणा देणारा आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. पी. डी. शिरगावे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक मेजर डॉ. अशोक डोनर प्रा.डॉ सी .एम. नाईक प्रा. डॉ.पी.वाय पाटील,प्रा. नितीन कोले ,प्रा.महावीर शेंडगे, प्रा.उमेश पाटील,प्रा. विनायक कुंभार कार्यालयीन वरिष्ठ लिपिक शिवाजी जाधव, तसेच एम.डी .हायस्कूलचे रमेश देसाई, रवींद्र भोसले, आर. डी पाटील, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.