निपाणी नगरी वृत्तसेवा (17)
निपाणी शहरवासीयांनी पाहिलेले स्वप्नवत नगर लवकरच लाभार्थ्यांच्या सहकार्याने सर्वांना येत्या काही दिवसात शुभ मुहूर्त पाहून घरकुले सुपूर्द करणार आहे. कारण शहरातील घरकुल योजनेच्या कामांना आता वेग आला असून आतापर्यंत सुमारे सहाशे घरे पूर्णपणे तयार झाली असून उर्वरित घरांचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू असुन त्या घरांचे कामही अंतिम टप्प्यात असून लवकरच लाभार्थ्यांना घरांचा ताबा देण्यात येणार असल्याची माहिती आमदार शशिकला जोल्ले यांनी दिली. त्या काल निपाणी नगरपालिकेच्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या बैठकीत बोलत होत्या. यावेळी बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
आमदार जोल्ले पुढे म्हणाल्या की, 2012 पासून 2026 पर्यंत निपाणी शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, गटारी व वीज यांसारख्या मूलभूत सुविधांसह घरकुल योजनेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. अजून देखील या घरकुल योजनेसह गटारी, लाईट, रस्ते, बस स्टॅन्ड, आर ओ प्लांट, यांची देखील तजवीज करत असून एक निपाणी शहराला शोभेल असे हे नगर करणार असल्याचा पुनरुच्चार आमदारांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सन्मानासाठी स्वच्छता आणि शौचालय सारख्या योजना राबविल्या. त्याचबरोबर निपाणी मतदार संघातील सुमारे 8 हजार महिलांना गॅस कनेक्शन देण्यात आली असून अनेक योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.
निपाणी येथे घरकुल योजनेअंतर्गत 1812 घरे उभारण्याचे नियोजन असून त्यापैकी सहाशे घरे पूर्ण झाली आहेत. पुढील काही महिन्यांत उर्वरित घरे पूर्ण करून लाभार्थ्यांना घरांचा ताबा देण्यात येणार आहे. घरांचे वाटप लॉटरी पद्धतीने किंवा लाभार्थ्यांच्या मागणीनुसार पारदर्शकपणे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. घरकुल योजने बरोबरच महिलांसाठी लघुउद्योग निर्मिती करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही आमदार जोल्ले यांनी सांगितले.
कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्ष संतोष सागांवकर, भाजप शहराध्यक्ष राजू गुंदेशा, राजू देसाई, सुनील पाटील, जुबेर बागवान, विजय टवळे , महेश सूर्यवंशी, नगरपालिका कर्मचारी प्रवीण कणगले, सागर मेस्त्री, विशाल लाटवडे, इंद्रजीत घस्ते, उत्तम चव्हाण यांच्यासह मान्यवर व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक व आभार पालिका कर्मचारी संपत कुरणे यांनी केले.
अजूनही वेळ गेलेली नाही या आणि बुक करा.. जोल्ले
आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अजून देखील वेळ गेलेली नसून ज्या गोरगरीब दीनदलित जनतेकडे स्वतःची जागा नाही,घर नाही यांनी अजून देखील नगरपालिकेशी संपर्क साधून आपले घरकुल निवड करण्याची वेळ असून लवकरात लवकर करण्याची आवाहन देखील आमदारांनी केले.
12 लाभार्थ्यांची लिस्ट तयार करणे अयोग्य… लाभार्थ्यांतुन सुर..
उपस्थित असलेल्या लाभार्थ्यांनी घरकुल मंजूर झाल्याबद्दल आमदारांचे कौतुक केले. व आपल्या स्वप्नातील घर पूर्ण झाल्याबद्दल कृतज्ञता देखील व्यक्त केली. पण भाषणामध्ये आमदारानी घरकुल वाटपाची जी 12 लाभार्थ्यांची लिस्ट तयार करण्याचा किंवा लॉटरी पद्धतीचा प्रस्ताव मांडला. त्याला अनेकांनी आपली लिस्ट तयार करण्याच्या मुद्यावर दुजोरा जरी दिला असता तरी. एकाच माळ्यावर म्हणजेच बिल्डिंगमध्ये आपलेच लोक राहणार असा एखाद्या व्यक्तीने हट्ट केला तर वेगळीच तेढ निर्माण होऊ शकते. अशी दबक्या आवाजात चर्चा लाभार्थी कार्यक्रम स्थळी करत होते.