निपाणी नगरी वृत्तसेवा..(18)
बसवण नगर, निपाणी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही बसवण यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बसवण नगर यात्रा उत्सव समितीच्या वतीने 19 मार्च ते 22 मार्च 2026 या कालावधीत हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी सकाळी 7 वाजता अभिषेक कार्यक्रम होणार असून सायंकाळी 6 वाजता पारंपरिक पालखी सोहळा काढण्यात येणार आहे. तसेच शनिवार दिनांक 21 मार्च रोजी सकाळी 11 वाजता श्वान शर्यत, सायंकाळी 6 वाजता आंबील घागरी व रात्री 7 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रेनिमित्त आकर्षण ठरणाऱ्या श्वान शर्यत स्पर्धेचे आयोजन शनिवार, 21 मार्च रोजी सकाळी 10 वाजता बसवण मंदिर समोर करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे फ्रिज, एल.ई.डी टीव्ही व कूलर अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून इतर क्रमांका साठीही पारितोषिके देण्यात येणार आहेत.
तसेच रविवारी दिनांक 22 मार्च रोजी दुपारी 3 वाजता गायकवाडी माळ येथे एक्का घोडागाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजेत्यांसाठी रोख बक्षिसे व ट्रॉफी देण्यात येणार आहेत.
या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.