निपाणी नगरी वृत्तसेवा अर्जुननगर (5) प्रतिनिधी
येथील देवचंद कॉलेजच्या कनिष्ठ वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी कारागीर महाकुंभ या भव्य महोत्सवाला उत्साहात भेट देत भारतीय कला, कौशल्य आणि ग्रामीण उद्योजकतेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. हा महोत्सव सिद्धगिरी कणेरी मठ येथे आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवात देशभरातील २०० हून अधिक कारागीर सहभागी झाले असून विविध राज्यांतील हस्तकला, विणकाम, मातीकाम आणि धातूकाम यांसारख्या कलांचे आकर्षक प्रदर्शन पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल्सना भेट देत कारागिरांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या कौशल्यातील बारकावे जाणून घेतले.
वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ही भेट अत्यंत उपयुक्त ठरली. बाजारपेठेतील व्यवहार, उत्पादनांचे मार्केटिंग, तसेच ग्रामीण लघु व कुटीर उद्योगांची कार्यपद्धती याचा त्यांनी प्रत्यक्ष अभ्यास केला. त्यामुळे पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक समज वाढण्यास मदत झाली.
महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले की, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना भारतीय अर्थव्यवस्थेच्या पायाभूत घटक असलेल्या ग्रामीण कारागिरीची ओळख होते. भविष्यातील उद्योजक म्हणून हा अनुभव त्यांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल.”
या अभ्यासभेटीसाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह, खजिनदार श्री. सुबोधभाई शाह, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. जी. डी. इंगळे, उपप्राचार्या सौ. एस. पी. जाधव तसेच पर्यवेक्षक मेजर डॉ. अशोक डोनर यांचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमाचे आयोजन कनिष्ठ वाणिज्य विभागातील प्रा. नितीन कोले, प्रा. प्रवीण सूर्यवंशी, प्रा. राणी सोकासने आणि प्रा. सुधा आरबोळे यांनी केले.