निपाणी नगरी वृत्तसेवा (29)
निपाणी येथील हरिनगरमधील पहिल्या गल्लीत गुरुवारी मध्यरात्री १२ ते २ च्या सुमारास एका नवविवाहितेने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. गुरुसिद्धवा प्रशांत हगरगी असे आत्महत्या केलेल्या २१ वर्षीय विवाहितेचे नाव आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी, म्हणजेच २१ एप्रिल २०२६ रोजी गुरुसिद्धवा हिचा विवाह प्रशांत हगरगी याच्याशी झाला होता. लग्नाला महिना उलटतो न उलटतो तोच अल्पावधीतच ही अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने सर्वजण आश्चर्यचकित झाले असून परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
शुक्रवारी सकाळी ही घटना वाऱ्यासारखी हरिनगर परिसरात पसरताच नागरिकांनी मृतदेहाच्या दर्शनासाठी आणि माहिती घेण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती निपाणी शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ तसेच निपाणीचे सीपीआय बी. एस. तळवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर निपाणीचे तहसीलदार सुरेश मुंजे यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
दरम्यान, या नवविवाहितेच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शुक्रवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास तहसीलदार सुरेश मुंजे, सीपीआय बी. एस. तळवार, उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ आणि फॉरेन्सिक लॅबच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संयुक्त भेट देऊन घटनास्थळाची सखोल पाहणी केली आणि आवश्यक ते पुरावे गोळा केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी महात्मा गांधी रुग्णालयात पाठविण्यात आला. या संपूर्ण घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करीत आहेत.